पुणे : महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीच्या ठरलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब बोडके यांनी शनिवारी बाजी मारली. त्यांनी भाजपाचे उमेदवार राजेंद्र शिळीमकर यांचा ९ विरूद्ध ३ मतांनी पराभव केला. काँग्रेसने शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेऊन आघाडी धर्माचे पालन केले. मनसेने निवडणुकीवर बहिष्कार टाकला, तर शिवसेना तटस्थ राहिली.महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पीठासीन अधिकारी पियुष सिंग यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी साडेअकरा वाजता सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समितीचे ६ सदस्य पक्षाचे उपरणे परिधान करून सभागृहात येऊन बसले. त्यापाठोपाठ भाजपा, काँग्रेस, शिवसेनेचे स्थायी सदस्य सभागृहात आले. मनसेचे ३ सदस्य सभागृहात अनुपस्थित राहून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले.पिठासीन अधिकाऱ्यांनी नियमानुसार अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ उमेदवारांना दिला. त्या वेळी काँग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे व त्यांचे इतर २ सहकारी बाहेर गेले. मनसे अनुपस्थित राहिल्याने जर-तरच्या सर्व शक्यता संपुष्टात आल्या होत्या, त्यामुळे अखेर राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबदल्यात ३ समित्यांचे व प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद देण्याचा शब्द राष्ट्रवादीकडून घेण्यात आला. त्यामुळे बाळासाहेब बोडके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.