केंदूर (पुणे) : येथील चासकमान कालव्याच्या पाण्यामध्ये खेड तालुक्यातील बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळून आला असून शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कालव्याच्या पाण्यामध्ये एका युवकाचा मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांना दिसले. याबाबतची माहिती पोलिस पाटील वंदना साबळे यांनी शिक्रापूर पोलिसांना दिली.
दरम्यान, पोलिस हवालदार कृष्णा व्यवहारे, स्वप्निल गाडेकर, होमगार्ड योगेश बधे, पोलिस पाटील वंदना साबळे यांनी सदर ठिकाणी धाव घेत सामाजिक कार्यकर्ते राघू नप्ते, कचरू वाजे, कोंडीबा साबळे, अमोल नप्ते, विशाल नप्ते, संभाजी सातपुते, संदीप बेंडभेर, विनायक सातपुते, अतिश साबळे, दिगंबर फुलसुंदर, महादेव मांजरे यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.
यावेळी सदर मृतदेह हा निमगाव खंडोबा येथून बेपत्ता झालेल्या दादाभाऊ पोपट भालेराव (२८, रा. निमगाव खंडोबा, ता. खेड) या युवकाचा असल्याचे समोर आले. याबाबत सुरेश बाबुराव भालेराव (रा. निमगाव खंडोबा, ता. खेड) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.