सांगवी (पुणे) : मेडद (ता.बारामती) गावाच्या हद्दीत शेताच्या बांधालगत लिंबाच्या झाडाखाली अंदाजे साठ वर्षांच्या अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुई ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला होता. शवविच्छेदना दरम्यान हृदय विकारच्या झटक्याने महिलेचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालात निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली आहे. यामुळे महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात सुरू झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या चर्चेवर अखेर शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पोलिसांकडून पडदा टाकण्यात आला.
बुधवार (दि.5) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान बारामती-मोरगाव रस्त्यालगत असणाऱ्या शेतात हा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत मेडद गावाचे पोलीस पाटील यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या महिलेची ओळख पटण्यासाठी माळेगाव पोलिसांनी ग्रामस्थांशी संपर्क साधला असता अध्याप या महिलेची ओळख पटली नसल्याचे सांगण्यात आले.
मयत महिलेचे केस पांढऱ्या व काळे रंगाचे असून, नाकात पांढऱ्या धातूची नथ, उजव्या हातामध्ये सहा काचेच्या हिरव्या बांगड्या व एक हिरव्या रंगाची पाटली, तसेच मयताचे कपाळावर लाल रंगाची टिकली आहे. फिकट बदामी रंगाची व काळे फुले असलेली हिरवा निळा कडा असलेली साडी व राखडी रंगाचा ब्लाऊज घातलेला दिसत आहे. तसेच मयत महिलेच्या जवळ कातड्याच्या चप्पल मिळून आल्या आहेत. वरील वर्णनाची मयत बाबत ओळख पटल्यास माळेगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी केले आहे.