कात्रज : कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात मंगळवारी सकाळच्या सुमारास एक महिलेचा मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगत असल्याचे सुरक्षारक्षकाला आढळून आले. सुरक्षा रक्षकाडून याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. पोलीस प्रशासन तसेच अग्निशमन दलाला माहिती मिळताच घटनास्थळावर दाखल झाले. अग्निशामक दलाच्या पाच जवानांकडून महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून मिसिंगच्या काही तक्रारी आल्या आहेत का हे पडताळून मृतदेहाची ओळख पटवण्यात येईल असे सांगण्यात आले. तसेच महिलेचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून येथे पाठवण्यात आला. या घटनेदरम्यान कात्रज तलाव परिसरामध्ये बघ्यांची गर्दी जमलेली होती. यावेळी अग्निशामक दलाकडून तांडेल - वसंत भिलारे, फायरमन प्रसाद कदम, निलेश राजीवडे, शुभम शिर्के, अविनाश लांडे, ड्राइवर गोगावले उपस्थित होते.
''कात्रज अग्निशमन दलाला साधारण १० च्या सुमारास यासंदर्भात कॉल आला होता. अग्निशमन चे पाच जवान, एक ड्रायव्हर , एक अधिकारी यांनी मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. - संजय रामटेके, केंद्रप्रमुख, कात्रज.''
''तब्बल २९ एकर जागेमध्ये पेशवे तलाव आहे. येथे रात्र दिवस एक सुरक्षा असतो. तसेच रस्ता खुला असल्याने परिसरातील लोक ये - जा करत असतात. त्यामुळे अशा घटनांवर अंकुश ठेवणे कठीण आहे. - वसंत मोरे, माजी नगरसेवक.''
''कात्रज तलाव परिसरामध्ये अशा घटना टाळण्यासाठी शिवशंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सुरक्षा रक्षक वाढवण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. त्यामुळे येथील सुरक्षा रक्षक वाढवावे. - महेश कदम,शिवशंभू प्रतिष्ठान.''