- किरण शिंदे
पुणे : लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. सनी रमेश आठवले (वय २८) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुणाच्या नातेवाईकांनी मात्र घातपात झाल्याचा संशय व्यक्त केलाय. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एक तरुण अल्पवयीन आहे. मयत तरुणाचा नातेवाईक कुंदन बाबुराव आठवले यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. धनकवडीतील प्रियदर्शनी शाळेजवळील श्लोक बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला.
याप्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, सनी रमेश आठवले हा मागील वर्षभरापासून एका महिलेसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता. मात्र या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे असे फिर्यादी कुंदन आठवले यांनी सांगितले. याशिवाय सनी ज्या महिलेसोबत लिव-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते त्या महिलेचे नातेवाईकही त्याला धमकी देत होते असे फिर्यादी कुंदन आठवले यांनी सांगितले.
दरम्यान बुधवारी मध्यरात्री फिर्यादी यांना सनी आठवले ज्या मुली सोबत राहत होता तिने फोन केला आणि सनी याने गळफास घेतल्याची माहिती दिली. सुरुवातीला फिर्यादी यांचा विश्वास बसला नाही. त्यांनी सनी याच्या एका मित्राकडून माहिती घेतली असता हा प्रकार खरा असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी पुण्यात धाव घेतली. मात्र आठवले यांनी सनीच्या मृत्यूबाबत काही संशय व्यक्त केला. सनीचा मृत्यू झाला की घात झाला याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी ही त्यांनी केली. सहकारनगर पोलिसांनी संबंधित महिलेसह तिघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.