पुणे : सीमेवर भारतभूमीची सुरक्षा करताना वीरमरण आलेले मेजर शशीधरन नायर (३२) यांचे पार्थिव शनिवारी सायंकाळी घोरपडीतील राष्ट्रीय युध्द स्मारकावर आणण्यात आले. तेव्हा ‘शहीद मेजर नायर अमर रहे’ अशा घोषणांसह सलामी देण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात नायर शहीद झाले.
संध्याकाळी त्यांचे पार्थिव पुण्यातील दक्षिण मुख्यालयातील वॉर मेमोरियल येथे आणण्यात आले. तिथे त्यांचे कुटुंबीय तसेच लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. नायर यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांच्यामागे आई, पत्नी आणि बहीण असा परिवार आहे. त्यांची बहीण अविवाहित असून वृद्ध आई व पत्नीची जबाबदारी पेलण्यास आता घरात कोणीही नाही. शुक्रवारी दुपारी त्यांचा आलेला फोन शेवटचाच ठरला.लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार
नायर यांचे पार्थिव रात्री सदन कमांड येथील रुग्णालयात रात्रभर ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी सात वाजता त्यांच्या खडकवासला भागातील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशान भूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.