पुणे (लोणावळा) : हैदराबाद येथून पुण्यात कामासाठी आलेल्या एका युवतीचा मृतदेह लोणावळ्याजवळील लायन्स पॉईंट्स येथील दरीत आढळलेला मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाने रविवारी यश आले. ही घटना आत्महत्या की, अपघात हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अलिझा राणा (वय-२४, रा. मूळ हैद्राबाद) असे लायन्स पॉईंट्स येथील मृतदेह आढळलेल्या युवतीचे नाव असून, ती हिंजवडी आयटी पार्क येथील एका कंपनीत नोकरीला होती.मिळालेल्या माहितीनुसार अलिझा राणा गुरूवारी कामाला सुट्टी असल्याने ती एका खाजगी टॅक्सीने गुरूवारी १२ सप्टेंबरला लोणावळ्यात फिरायला म्हणून आली होती. ती पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्या जवळील लायन्स पॉईंटवर फिरायला गेली होती. त्या ठिकाणच्या एका कड्यावर तिची बॅग सापडली होती. याबाबत स्थानिकांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत बॅग तपासली असता, बॅगमध्ये एक मोबाईल फोन व ओळखपत्र मिळून आले. पोलिसांनी सदर फोन वरून तिच्या भावाशी संपर्क साधून त्याला लोणावळ्यात बोलावून घेत बॅगची खातरजमा केली. त्यानंतर सदर बॅग अलिझा हिचीच असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी या घटनेचा तपास व शोध घेण्यासाठी शुक्रवारी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केले होते. पथकाने येथील दरीत उतरून शोध घेतला होता, मात्र त्यांना काहीही आढळले नव्हते. पुन्हा आज रविवारी सकाळी शिवदुर्गच्या रेस्क्यू पथकाने शोध मोहीम हाती घेतली. दुपारी साडेतीन वाजता लायन्स पॉईंट्स येथील एका दरीत तीनशे फुट खोल अंतरावर एका युवतीचा मृतदेह आढळून आला. सायंंकाळी साडेपाच वाजता अलिझाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे.
या कामात शिवदुर्ग पथकातील आनंद गावडे, चंद्रकांत गाडे, राजेंद्र कडु, वैष्णवी भांगरे, विकास मावकर, दुर्वेश साठे, राहुल देशमुख, प्रविण ढोकळे, सनी कडु, निकेत तेलंगे,अशोक उंबरे, महेश मसने, अभी बोरकर, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, अंकुश महाडीक, प्रणय अंबुरे, वैभव शेलार, अजय शेलार, प्रविण देशमुख, ओंकार पडवळ, कपिल दळवी,योगेश अंभोरे, अमोल परचंड, चंद्रकांत बोंबले, अनिकेत आंबेकर, प्रिन्स बैठा, हर्ष तोंडे रोहित वर्तक, समीर जोशी, सुनील गायकवाड यांचा समावेश होता.