पुणे (वारजे) : साधारण आठवड्यापूर्वी नदीकाठी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविणे अद्याप बाकी असताना वारज्यात पुन्हा एका महिलेचा मृतदेह सापडल्याने पोलीसही चक्रावले आहेत. आता येथील गार्डन सिटी मागे म्हाडा (बीएसयूपी) कॉलनी परिसर रस्त्यालगत असलेल्या चेंबरमध्ये एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे.परिसरातील नागरिकांना वास आल्याने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण आणि वारजे पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, यांनी सहकार्यांसाह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदरील मृत अनोळखी महिलेच्या अंगात मेहंदी रंगाचा पंजाबी ड्रेस आहे. सदरील महिलेचा खून करून विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने हा मृतदेह अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी चेंबर मध्ये टाकला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.चार पाच दिवस पाण्यात राहिल्याने चेंबर मधील हा मृतदेह फुगलेला व काही प्रमाणात सडलेल्या अवस्थेत असून महिलेचा हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर सदरील मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून पुढील तपास वारजे माळवाडी पोलिस करीत आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वीच वारजे येथील मुठा नदीपात्रामध्ये नायलॉनच्या बॅगमध्ये तरुणाचामृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती आठवडाभर प्रयत्न करूनही अद्यापा त्याचा सुगावा लागला नाही. सगळीकडे छायाचित्र प्रसिध्द करूनही अद्यापपर्यंत याचा छडा लावण्यात पोलिसांना यशआलेले नाही.
वारज्यात चेंबरमध्ये आढळला पस्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 8:55 PM