लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नी आणि मुलाचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पती आबिद शेख बेपत्ता झाला होता. मात्र, शुक्रवारी त्याचा मृतदेह सिंहगड परिसरातील खानापूर गावाजवळ नदीपात्रात सापडला आहे. त्यामुळे याप्रकरणाचे गूढ वाढले आहे. दोघांचे खून करून पतीने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलाचा वेगवेगळ्या भागात मृतदेह सापडल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. अयान अबीद शेख (वय ६,रा. धानोरी) याचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर सापडला होता. तत्पूर्वी अयानची आई अलिया (वय ३५) हिचा मृतदेह पुरंदर तालुक्यातील खळद गाव परिसरात सापडला होता. तपासात दोघांचे खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. दोघांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा आबिद शेख, त्याची पत्नी अलीया आणि मुलगा अयान भाडेतत्वावर घेतलेल्या मोटारीतून बाहेर फिरायला गेले होते. दोघांचे मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी आबिदचा शोध सुरू केला होता. पुणे-सातारा रस्त्यावर आबिदने मोटार लावली होती. तेथून तो चालत स्वारगेटकडे गेल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले होते. दरम्यान, आबिदचा शोध सुरू केल्यानंतर सिंहगड परिसरातील खानापूर गावात नदीपात्रात आबिदचा मृतदेह सापडला. हवेली पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असून, खुनामागचे कारण समजू शकले नाही. पत्नी आणि मुलाचा खून करून आबिदने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
---