बारामती : पिंपळी (ता. बारामती) येथे एका महिलेचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी (दि. १६) उघडकीस आली. सडलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला आहे. गेल्या २५ डिसेंबर २०१५ पासून ही महिला बेपत्ता होती. या महिलेचा १० ते १२ दिवसांपूर्वी खून झाला आहे. तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जया काळू सोनवणे (वय ३५, रा. पिंपळी, ता. बारामती) असे या महिलेचे नाव आहे. येथील संतोष महादेव ढवाण यांच्या शेतात या महिलेचा मृतदेह आढळला. ढवाण यांच्या शेतातील मजूर पिंटू लक्ष्मण गायकवाड (रा. भांडगाव) याने बांधीव विहिरीजवळील उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह असल्याचे सांगितले. त्यानंतर या मृतदेहाबाबत पोलिसांना कळविण्यात आले. अर्धनग्न अवस्थेत हा मृतदेह पडून होता. या वेळी महिलेच्या अंगावरील साडीने हात, गळा बांधलेला आहे. दोन्ही हात जोडलेल्या अवस्थेत आहेत. महिलेच्या मृतदेहाजवळ बिअरची बाटली, गर्भनिरोधक साधने सापडली आहेत. तसेच या ठिकाणी औषधांची पाकिटेदेखील सापडली आहेत. पोलिसांनी ही औषधे उत्तेजनासाठी वापरल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गावात या घटनेची माहिती समजल्यावर खळबळ उडाली. पोलीस प्रशासनाने तातडीने सूत्रे हाती घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक राहुल यादव, एम. ए. खान, दिलीप सोनवणे, जालिंधर जाधव, डी. एम. ठोंबरे आदी पोलीस कर्मचारी दिवसभर या महिलेबाबत कसून शोध घेत होते. अखेर सायंकाळी ६ वाजता या महिलेची मुलगी चंदाराणी आकाश गायकवाड (रा. शिवरी, ता. पुरंदर) हिने मृतदेह ओळखला. महिलेच्या पायातील चप्पल, कडदोरा यावरून तिने मृतदेह ओळखला. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात विच्छेदनानंतर नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)
कुजलेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2016 1:31 AM