वाफगाव : निर्मलग्रामचा पुरस्कार मिळविण्यासाठीच वाकळवाडी (ता. खेड) येथे शौचालयाच्या बोगस नोंदी केल्याचे दिसून आले आहे. मात्र, यामुळे जिल्ह्यातील निर्मलग्राम अभियानाच्या कामगिरीबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. खेड तालुक्यातील राजगुरूनगरपासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकळवाडीत शौचालयाच्या नोंदी बोगस झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवळे यांनी केली होती. शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्यात येत असल्याने यामध्ये भ्रष्टाचार झाला असण्याच्या शक्यतेने जिल्हा परिषदेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल साकोरे यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने गावाला भेट दिली. यामध्ये भ्रष्टाचार नव्हे तर केवळ गावाला निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त व्हावा, यासाठीच या नोंदी केल्याचे दिसून आले आहे. याबाबत साकोरे म्हणाले, ‘‘ दारिद्रयरेषेखालील अथवा सर्व नियम व अटींना पात्र होणा-या कुटुंबांना शौचालय बांधकामासाठीचे प्रोत्साहन अनुदान दिले जाईल. २ आॅक्टोबर २०१४ नंतर बांधण्यात आलेल्या अथवा येणा-या शौचालयांना प्रत्येकी बारा हजार रूपये अनुदान दिले जाईल. त्यासाठी गावचे सरपंच, ग्रामसेवकांनी तातडीने विशेष ग्रामसभा लावून झालेल्या बोगस नोंदी रद्द करण्याचा ठराव घेणे गरजेचे आहे. पात्र असलेल्या १०० कुटुंबांच्या यादीतील लाभार्थ्याने शौचालय बांधणे बंधनकारक आहे. ज्यांचे शौचालय पुर्ण झाले असेल, त्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये संबंधित अनुदान जमा केले जाईल,. पथकामध्ये के. बी. नेहरे, सरपंच राजेश गुरव, गणपत पवळे, सिताराम वाळूंज, धमर्राज पवळे, अरूण पवळे, बाबाजी पवळे, ग्रामसेवक के. एन. खैरे, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.या पथकाने वाकळवाडीतील गावठाण, उंबरमाळ (संभाजीनगर) येथील शौचालयांची स्थिती प्रत्यक्ष जाऊन पाहिली. ग्रामपंचायतीचे संपूर्ण दप्तर तपासण्यात आले. (वार्ताहर)
निर्मलग्रामसाठीच बोगस नोंदी!
By admin | Published: December 22, 2014 11:36 PM