देहूरोड : परिसरातील चिंचोली, किन्हई, शेलारवाडी, विकासनगर -किवळे, रावेत, मामुर्डी, साईनगर,गहुंजे व सांगवडे परिसरात भोगी व मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्याची लगबग दिसत आहे. शहरी व ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात मुलांची लग्न झालेल्या कुटुंबात सुनेला ‘ओवसा’ नेण्याची परंपरा असल्याने देहूरोड बाजारपेठेत ओवशासाठी आवश्यक वस्तू व साडीखरेदीसाठी दुकानांत गेल्या दोन तीन दिवसांपासून गर्दी दिसत आहे. सुगड दान करण्यासाठी व हळदी-कुंकू कार्यक्रमात नित्योपयोगी वस्तू वाटण्याची पद्धत असल्याने अशा वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी होऊ लागली आहे. महापालिका निवडणूक जवळ आल्याने काही इच्छुकांनी आगामी मकरसंक्रातीचा सण कॅश करण्याची तयारी केली आहे. संक्रांत स्रिया उत्साहाने साजरी करत असतात. संक्रातीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी साजरी करण्याची सर्वत्र परंपरा असून भोगीच्या दिवशी विविध भाज्यांची एकत्र भाजी बनवली जाते. बाजरीची भाकरी बनवून त्यावर तीळ लावले जात असून दिवसभर सर्व घरांत सरसकट भाजी व भाकरीचा बेत दिसून येतो. कामगारांच्या जेवणाच्या डब्यालाही भाकर व एकत्र बनविलेली भाजी देण्यात येते. या एकत्रित केलेल्या भाजीत प्रामुख्याने वाटाणा, पावटा, गाजर, बटाटा, वांगे, हरभरा, घेवडा, बोम्बल्या घेवडा, पापडी आदी भाज्यांचा समावेश असतो. संक्रातीच्या दिवशी परिसरातील बहुतांश सुवासिनी स्त्रीया श्रीक्षेत्र देहूगाव, आळंदी, शिरगाव व घोरवडेश्वर डोंगरावरील मंदिरात सुगड दान करण्यासाठी जात असतात. ज्या कुटुंबात मुलाचे लग्न झाल्यानंतरचे पहिले वर्ष आहे, त्याच्या बायकोसाठी माहेरी जाऊन साडी व ‘ओवसा’ देण्याची परंपरा अद्यापही पाळण्यात येत आहे. ओवसा म्हणजे ऊस, गाजर, हरभरा, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तिळगुळ आदी. भावकीतील व आळीतील सुवासिनींना ओवसा पाहण्यासाठी बोलावण्याची पद्धत आहे. (वार्ताहर) तिळाचे महत्त्व : स्नेह निर्माण होण्यासाठी प्रयत्नसंक्रांत हा स्नेह वाढविणारा सण असल्याने व परंपरेने सुवासिनी स्त्रियांनी हळदी-कुंकू, तिळगूळ व नित्योपयोगी वस्तू एकमेकींना भेट म्हणून दिल्या जातात. लहान मुले व पुरुष मंडळींही आपल्या मित्र -मैत्रिणींना तिळगूळ देत ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ असे आवर्जून सांगतात. संक्रातीला तिळाचे विशेष महत्त्व असून तिळाच्या अंगी जशी स्निग्धता आहे, तशी स्निग्धता स्नेहरूपाने आपल्या मित्र मंडळींमध्ये निर्माण व्हावी अशी यामागे प्रत्येकाची भावना असते.
भोगी, संक्रांतीची लगबग
By admin | Published: January 13, 2017 2:57 AM