पुणे : पुणे जिल्हा वृद्ध कलाकार आणि मानधन समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची निवड झाली असून त्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत बैैठक घेऊन आढावा घेतला. एकही बोगस कलाकाराला मानधन मिळता कामा नये, तसे झाल्यास मी माझ्या पदाचा राजीनामा देईन, असा झटका त्यांनी आपल्या पहिल्याच बैैठकीत दिला. माझी निवड ही फक्त शोभेची न राहता मला यासाठी वेळ दिला पाहिजे, अशी भूमिका घेत मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या दालनात बैठक घेतली. यात गप्पा मारणे हा माझा येथे येण्याचा उद्देश नाही. शासनाने माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन, असे सुरुवातीलाच स्पष्ट केले. माझ्या आजीला ७५० कलाकार मानधन मिळत होते. तिच्या मृत्यूनंतर आम्ही ते शासनाला कळवून लगेच बंद केले, असे स्पष्ट करीत त्यांनी खरोखरच गरजवंत जे आहेत त्यांनाच मानधन मिळाले पाहिजे. सरकारला आमची आठवण होईल. मानधन मिळेल, अशी वाट पाहत बसले आहेत, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. मी खेडेगावात माझ्या आयुष्याची ४० वर्षे काढली आहेत. तेथे उरसाला होणारा तमाशा मी पाहिला आहे. त्यांची कलेविषयीची धडपडही मी जवळून पाहिली आहे. हे तमाशा कलावंत हलाखीचे जीवन जगतात. त्यामुळे या लोककलावंतांना अगक्रम देऊ, तळागाळातील जे कलावंत वंचित आहेत, जे भुकेले आहेत त्यांच्या तोंडात पहिल्यांदा घास घालू, असे गोखले यांनी या वेळी स्पष्ट केले. यादी तयार करताना वंचितांना न्याय मिळाला पाहिजे, वशिलेबाजी झाली तर मी लगेच माझ्या पदाचा राजीनामा देईन, असा इशाराही गोखले यांनी दिला. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी हे मानधन पारदर्शकपणे आपल्याकडे दिले जाते. तसे होणार नाही. यात पारदर्शकता राहील, असा शब्द गोखले यांना दिला. (प्रतिनिधी) कलाकारसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न यासाठी फक्त ६० कलावंतांची मर्यादा आहे. ती वाढविणे गरजेचे असल्याचे या वेळी शितोळे यांनी सांगितले. यावर पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करून ही मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करू, असे गोखले यांनी सांगितले. विठाबार्इंना न्याय द्या नारायणगावच्या तमाशा कलावंत राष्ट्रपतीपदकविजेत्या विठाबाई भाऊ मांग यांना न्याय मिळावा, म्हणून आम्ही शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत, पण त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. यासाठी सहकार्य करा, अशी व्यथा या वेळी आशाताई बुचके यांनी मांडली. यावर शासनाकडे आपण याबाबत बोलू, असे आश्वासन त्यांनी दिले. १ हजार ५४४ कलावंत २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील १ हजार ५४४ कलावंतांना मानधन दिले जाते. यात ‘अ’ वर्गासाठी २१०० रुपये असून यात ३४ कलावंत आहेत. ब वर्गासाठी १८०० रुपये दिले जात असून यात ५०, तर क वर्गात १ हजार ४६० कलावंत असून त्यांना १५०० रुपये मानधन याप्रमाणे १ कोटी ७१ लाख २९ हजार रुपये मानधन दिले आहे. २१ एप्रिलला पुन्हा आढावा जबाबदारी घेतली म्हणजे ती निभावता आली पाहिजे, असे सांगत वारंवार आढावा बैठका घेणे गरजेचे आहे. २१ एप्रिल रोजी पुन्हा बैैठक घेऊन पुढील नियोजन करू, असे या वेळी ठरविण्यात आले.
बोगस कलाकार मानधनाला बसणार चाप
By admin | Published: April 13, 2016 3:23 AM