पुणे: पुण्यासह राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. या काळात कीटकजन्य आजारांपासून विषाणूजन्य आजारांचेही प्रमाण वाढते. संभाव्य धाेका विचारात घेऊन नागरिकांनी पावसाळ्यात स्वत:ला निराेगी ठेवणे गरजेचे आहे. काही खबरदारी बाळगल्यास ते शक्य आहे, असे डाॅक्टर सांगतात.
पावसाळ्यात धरणसाखळीत नवीन पाणी येते. ते पाणी गढूळ असल्यामुळे दूषित पाण्यापासून हाेणारे आजार वाढतात. सर्वात प्रथम धाेका वाढताे ताे कावीळ, गॅस्ट्राे, जुलाब या जलजन्य आजारांचा. त्याचबराेबर पाणी साठल्यामुळे डासांची उत्पत्ती हाेते आणि डेंग्यू, चिकुनगुनियासह इतर कीटकजन्य आजारही वाढतात. त्यापासून बचाव करण्यासाठी आपल्या घरी आणि घराभोवती पाणी साचू न देणे आवश्यक आहे. तसेच, दूषित पाणी पिले जाण्याची शक्यता असल्याने पिण्याचे पाणी गाळून, उकळून थंड करून पिणे गरजेचे आहे.
जानेवारीपासून आजारांचे प्रमाण कमी हाेत जाते. उन्हाळ्यात तर आजारी पडण्याचे प्रमाण निम्म्याने घटते. पाऊस सुरू हाेताे तसे आजारी पडण्यास सुरुवात हाेते. खासकरून लहान मुले आणि घरातील वयाेवृद्धांना याचा सामना करावा लागताे. कारण त्यांची प्रतिकारशक्ती तरुणांच्या तुलनेत कमी असते.
...तर हाेईल दंड
पावसाळ्यात आपल्या घरात व मालकीच्या जागेत डेंग्यू डासांची किंवा डासांच्या अळ्यांची उत्पत्ती झाल्यास त्याचा दंड महापालिकेच्या आराेग्य विभागाकडून आकारला जाताे. हा दंड अगदी पाचशे रुपये ते १० हजार रुपयांपर्यंत तक्रारीच्या गंभीरतेनुसार आकारला जाताे. साेसायट्या, सरकारी कार्यालये, हाॅस्पिटल्स, खासगी कार्यालये या ठिकाणी हे डास न हाेऊन देण्याची जबाबदारी त्या-त्या ठिकाणच्या जबाबदार व्यक्तींवर असते. महापालिकेच्या आराेग्य विभागाने यावर्षी अशा प्रकारचा एप्रिलपर्यंत ४५ हजारांचा दंड केला आहे.
पावसाळा आल्याने राेगराईचा धाेका वाढताे. त्यासाठी प्रत्येकाने याेग्य ती काळजी घ्यावी. यामध्ये आपल्या घरात डासाेत्पत्ती हाेऊ न देणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी घरात फुलझाडांची कुंडी, फ्रीजमधील साचलेले पाणी नेहमी स्वच्छ करावे. आठवड्यातून एक दिवस काेरडा दिवस पाळावा. पाणी उकळून प्यावे. आजारी पडल्यास महापालिकेच्या दवाखान्यात जावे. - डाॅ. सूर्यकांत देवकर, सहायक आराेग्य अधिकारी, पुणे मनपा