भवानीनगर : आपल्या कारखान्याकडे उपपदार्थनिर्मिती प्रकल्प नसल्याने शेजारील कारखान्यांच्या ऊसदराची तुलना करता येणार नाही. मात्र, काही वर्षांपूर्वी आपणही या कारखान्यांपेक्षा अधिक भाव देत होतो, हे लक्षात घ्यावे. सध्याची परिस्थिती अडचणीची आहे. उगीचच ओढून ताणून भाव देऊ नये, ही काही सभासदांनी मांडलेली भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण, मागील काही वर्षांत असा ओढूनताणून दर दिल्यामुळे कारखान्याला ५० कोटींपर्यंतचा तोटा झाला, ही वस्तुस्थिती सभासदांनी समजून घ्यावी’’ , अशी महिती छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी दिली.कारखान्याच्या ६१व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे तज्ज्ञ संचालक अभिजित रणवरे, त्यांच्या पत्नी मोनिका रणवरे यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित कार्यक्र मात घोलप बोलत होते. ते म्हणाले, ‘‘कारखान्याकडे यंदा सभासदांच्या मालकीचा साडेतीन ते चार लाख टन ऊस उपलब्ध आहे. अतिरिक्त ऊस मिळविण्याचा प्रयत्न आहे. राज्यात चांगला कारखाना म्हणून कारखान्याचा नालौकिक आहे. शेतकऱ्यांच्या मालकीची ही संस्था चांगल्या पद्धतीने चालविली. यदां सर्वच धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील गळितासाठी चांगला ऊस उपलब्ध होण्याची आशा आहे. सभासदांचे विश्वस्त म्हणून संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यामुळे वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. १५० कोटींचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याचे मोठे आव्हान होते. साखरधंदा अडचणीतून जात असताना सभासदांच्या सहकार्याची गरज आहे. सभासदांनी बाहेर ऊस घालू नये. मागील काळात अतिरिक्त ऊस असताना कारखान्याने तोटा सहन करून बाहेरील कारखान्याना ऊस पुरविला. तो पुरवला नसता तर ऊस शिल्लक राहिला असता. हीच स्थिती पुढील हंगामात आहे. कार्यकारी संचालक गोविंद अनारसे म्हणाले, ‘‘१९०० रुपये प्रक्विंटल असणारे साखरेचे दर ३४०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले; परंतु केंद्राने दर नियंत्रित्र ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. त्यातून पुन्हा कारखानदारी अडचणीत येण्याची भीती आहे. संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष तानाजीराव थोरात म्हणाले, ‘‘संचालक मंडळाकडून यंदा गोड अपेक्षा आहेत. शुभेच्छा म्हणून काहीतरी सांगाल, ही आशा आहे. सभासद, कामगारांच्या कष्टांचे चीज करा.’’ अशोक काळे यांनी, ‘यंदा हुमणीच्या प्रादुर्भावामुळे गाळपासाठी किती ऊस उपलब्ध होईल?’ असा सवाल केला. तसेच, प्रत्येक संचालकाने प्रत्येकी १ कोटी ठेव गोळा करून, सभासदांकडून एकूण २४ कोटींच्या ठेवी गोळा कराव्यात. त्यातून भांडवल उपलब्ध होईल, अशी सूचना मांडली. तर, अॅड. संभाजीराव काटे यांनी ओढूनताणून भाव नको. सुवर्णमध्य साधा, असे मत व्यक्त केले.या वेळी छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे आदी संचालक, पदाधिकारी उपस्थित होते. कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले. कामगारनेते युवराज रणवरे यांनी सूत्रंसचालन केले.
दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर अग्निप्रदीपन
By admin | Published: October 12, 2016 2:29 AM