खोर : दौंड तालुक्यातील खोर येथील खोपाडा - राजुरीपाटी नजीक बोलेरो व दुचाकी यांच्यात भीषण अपघातात २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. संभाजी अंबर शिंदे (वय २० वर्ष,रा.देऊळगावगाडा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संभाजी माणिकराव माने (वय २२ वर्ष रा.खोर,ता.दौंड) व दुचाकी चालक सतीश गुलाब ठोंबरे (वय २६ वर्ष रा.रिसे-पिसे) दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ७ नोव्हेंबरला रात्री ८:३० च्या सुमारास ही घटना घडली. तर बोलेरो चालक राजेंद्र बन्सीलाल डोंबे वय २६ वर्ष (रा.खोर, ता.दौंड) यास कोणतीही इजा झाली नाही.
बोलेरो गाडी ही खोरच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. त्याचवेळी दुचाकीवरून तिघेजण हे भांडगावच्या दिशेने चालले होते. राजुरीपाटीच्या पुढे खोपड्या नजीक आल्यावर भरधाव वेगाने येत असलेल्या बोलेरो गाडीने दुचाकीला बोलेरो गाडीच्या मधोमध उडवून दिले गेले. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीस्वार संभाजी अंबर शिंदे हा युवक जागीच ठार झाला. तर संभाजी माने व सतीश ठोंबरे हे उडून रस्त्याच्या कडेला पडले गेले. गावातील नागरिक तिघांना भांडगाव येथील शिवमंगल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलने नकार दिल्यावर पुढे यवत येथील सरकारी दवाखान्याच्या अँब्युलन्स गाडीने दोन जखमींना पुढे लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहे.
बोलेरो चालक हा दारूच्या नशेत असल्याने त्याने अपघातस्थळी गाडी न थांबविता तो पळून गेला. मात्र पिंपळाचीवाडी येथे नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही बोलेरो गाडी पकडण्यात नागरिकांना यश आले. याबाबत यवत पोलीस ठाण्यात बोलेरो चालक राजेंद्र डोंबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश कर्चे व रमेश कदम करीत आहेत.