पुणे : पुण्याला हादरवून टाकणाऱ्या जर्मन बेकरी बाॅम्बस्फाेटाला 10 वर्षे पूर्ण झाली. 13 फेब्रुवारी 2010 राेजी हा बाॅम्बस्फाेट झाला हाेता. यात 17 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले हाेते. यात अनेक परदेशी नागरिक देखील हाेते. या स्फाेटांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी या स्फाेटात जखमी झालेल्या नागरिकांनी स्फाेटाच्या कटु आठवणी सांगितल्या.
शांत आणि परदेशी नागरिकांची वर्दळ असणारे काेरेगाव पार्क 13 फेब्रुवारीच्या संध्याकाळी बाॅम्बस्फाेटाने हादरुन गेले. संध्याकाळी सातच्या सुमारास जर्मन बेकरीमध्ये बाॅम्बस्फाेट झाला. सुरुवातीला गॅसचा स्फाेट झाल्याचे नागरिकांना वाटले. स्फाेटाच्या धक्क्यातून बाहेर आल्यानंतर जर्मन बेकरीमध्ये नागरिकांनी पाहिले असता मृतदेहांचा खच पडला हाेता. तर अनेक नागरिक जखमी झाले हाेते. यातच हाेते विकास गाैरव. त्या दिवशी नेहमीप्रमाणे विकास जर्मन बेकरीमध्ये चहा पिण्यासाठी आले हाेते. संध्याकाळी झालेल्या स्फाेटामुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेले. या स्फाेटात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायाला माेठी इजा झाली तर ऐकू देखील कमी येऊ लागले. स्फाेटानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर त्यांना शुद्ध आली.
या भीषण आठवणीबाबत बाेलताना विकास म्हणाले, सातच्या दरम्यान मी जर्मन बेकरीमध्ये चहा पित असताना भीषण स्फाेट झाला. क्षणार्धात हाेत्याचं नव्हतं झालं. स्फाेटानंतर मला वाटलं माझं शरीर आता संपून गेलं आहे, जगातला कुठलाच डाॅक्टर मला वाचवू शकणार नाही. त्यावेळी फक्त देवाचं नाव माझ्या मुखी हाेते. जर्मन बेकरीमध्ये नेहमीच आनंदाचे वातावरण असते. त्यादिवशी सुद्धा सगळे आनंदात हाेते. आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं इथे असं काही हाेईल. स्फाेटानंतर अर्धातास मी बेशुद्ध हाेताे. अर्ध्यातासाने मला शुद्ध आली. तेव्हा सगळे इकडे तिकडे पळत हाेते. एक व्यक्ती माझ्या पाेटावर पाय जाऊन जाणार तेवढ्यात मी त्याला आवाज देऊन सांगितले मी खाली पडल्याचे. त्यानंतर एका रिक्षावाल्याने मला रुग्णालयात दाखल केले.त्या स्फाेटामुळे माझे आयुष्यच बदलून गेले. गेली 10 वर्षे आम्ही जगण्याची लढाई लढत आहाेत. सरकारकडून जी अपेक्षित मदत मिळू शकली नाही.