कोंढवा: कोंढवा खुर्द येथील पालिका विकसित करत असलेल्या उद्यानामध्ये गुरुवारी दुपारी हँड ग्रेनेड सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विकसित होत असलेल्या या उद्यानाजवळ मोठमोठ्या सोसायट्या असल्याने या बॉम्बमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उंड्री - एनआयबीएम रस्त्यावर कोणार्क इंद्रायू सोसायटीजवळ असलेल्या उद्यानात ही घटना घडली आहे. उभा सोसायटीच्या अमेनिटी स्पेसवर पालिकेतर्फे नवीन उद्यान विकसित केले जात आहे. या ठिकाणी त्याबाबतचे ठिकठिकाणी माती टाकण्याचे काम काही कामगार नेहमी प्रमाणे करीत होते. बुधवारी सायंकाळी परवीन शेख या त्यांच्या मुलांना उद्यानात फिरण्यासाठी घेऊन आल्या होत्या. त्यांच्या मुलांना हा बॉम्ब झाडावर ठेवलेला दिसला. त्यांच्या मुलांनी ही घटना घरी गेल्यावर त्यांना सांगितली. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु,जेव्हा मुलांनी त्यांना त्यावर वस्तूवर काहीतरी लिहले आहे,असे सांगितले .त्यांनी नगरसेविका नंदा लोणकर यांना याबाबत कल्पना दिली. लोणकर यांनी याबाबत कोंढवा पोलिसांना कळविले. कोंढवा पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले व त्यांनी हा बॉम्ब ताब्यात घेतला. उद्यान व परिसरात अजून काही बॉम्ब आहेत की नाही याची खात्री बॉम्ब शोधक पथकाने श्वानाच्या मदतीने केली. परंतु,त्यांना काही आढळले नाही. हा जिवंत बॉम्ब असल्याचे कळत आहे, त्याची संहारक क्षमता बरीच असल्याने नागरिकांच्या जागरूकतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली आहे. पालिकेच्या उद्यानात सुरक्षारक्षक उपस्थित नसल्याचे आढळून आले आहे. हा बॉम्ब याठिकाणी कसा आला, जमिनीपासून जवळपास आठ फूट उंचीवर झाडावर हा बॉम्ब कोणी का ठेवला, त्याने तो येथे ठेवण्याचे कारण काय होते, याबाबत तपास कोंढवा पोलिस करीत आहेत. या बॉम्बवर लिहलेल्या सांकेतिक क्रमांकावरून त्याचा ठावठिकाणा काढण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे. उद्यानाच्या आजूबाजूला मोठ्या रहिवाशी गृहरचना सोसायट्या असल्याने अशा ठिकाणी बॉम्ब आढळल्याने परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.
कोंढवा येथील उद्यानात बॉम्ब आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 8:24 PM
बुधवारी सायंकाळी परवीन शेख या त्यांच्या मुलांना उंड्री - एनआयबीएम रस्त्यावरच्या कोणार्क इंद्रायू सोसायटीजवळ असलेल्या उद्यानात फिरण्यासाठी घेऊन आल्या होत्या. त्यांच्या मुलांना झाडावर ठेवलेला हा बॉम्ब दिसला.
ठळक मुद्देजमिनीपासून आठ फूट झाडावर ठेवला बॉम्ब. नागरिकांच्या जागरूकतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.