सातारा/पुणे : घरात काम करणाऱ्या महिलेला शिवीगाळ करत, मारहाण करून बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या पुण्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या घरात स्फोटके सापडली. दरम्यान, त्याने या महिलेच्या पिशवीत परस्पर टाकलेली अजून एक बॉम्ब सदृश्य वस्तू सातारा जिल्ह्यातील खटावमध्ये तिच्या नातेवाईकाच्या घरात पोलिसांना सापडली. लष्करातून निवृत्त झालेल्या चुलत्याकडून ही वस्तू मिळविल्याची कबुली आरोपीने दिली आहे.विश्वनाथ गणपती साळुंखे (वय ५६, रा. औदुंबर कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विश्वनाथ हा वाहनचालक म्हणून काम करतो. आईची तब्येत बरी नसल्याने तिच्या देखभालीसाठी त्याने एका महिलेची ‘केअरटेकर’ म्हणून नेमणूक केली. शुक्रवारी रात्री तो केअरटेकर महिलेला मारहाण करत होता. बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घराची झडती घेतली असता पोलिसांना एका पिशवीत संशयास्पद वस्तू आढळून आली. त्यावेळी बॉम्बशोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) पाचारण करण्यात आले. चेंडूच्या आकाराच्या दोन स्फोटकांची तपासणी केली असता ती लष्कराशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले.संबंधित महिलेच्या नातेवाइकासोबत एका पिशवीतून अशीच अजून एक वस्तू खटावला पाठविण्यात आल्याचे निष्पन्न होताच सातारा जिल्ह्यातील बॉम्ब शोधक पथकाने ही वस्तू ताब्यात घेतली. स्फोटकजन्य पदार्थ असल्याचे सकृतदर्शनी या पथकातील विजय साळुंखे, प्रमोद नलवडे, राजेंद्र शेळके, प्रमोद भुजबळ यांनी सांगितले. दोन पंचासमक्ष पंचनामा करून तत्काळ पुढील कार्यवाहीसाठी चिंचवड पोलिस ठाण्याकडे ही वस्तू तत्काळ पाठविण्यात आली. दरम्यान, लष्करी साहित्य गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्वत:जवळ बाळगणाऱ्या आरोपीची रवानगी सहा दिवसांसाठी पोलिस कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता लष्करातून निवृत्त झालेल्या चुलत्याकडून स्फोटके मिळविल्याची कबुली त्याने दिली. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ती आपल्याकडेच असल्याचे त्याने सांगितले. केवळ रंगबाजी !युद्धकाळात जवानांना शत्रूपासून सावध करताना ‘सिग्नल’ म्हणून सर्रास वापरली जाणारी ही स्फोटके बॉम्बसदृश्य असली तरी त्याद्वारे हानी अथवा इजा होत नाही. तर केवळ रंगबाजी होते. मोठ्या लिंबाएवढ्या आकाराच्या या स्फोटकाला धातूचे आवरण असून, वातीला बत्ती लावल्याशिवाय त्याचा स्फोट होत नाही.साताऱ्याचे पोलिस लागले कामाला !पुणे पोलिसांच्या तपासात आरोपीचे अनेक कारनामे उघडकीस आले. त्याने या स्फोटकांपैकी एक वस्तू खटावमधील एका महिलेच्या पिशवीत टाकल्याचे समजताच पुसेगाव पोलिस ठाण्याची यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर शनिवारी पहाटे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे, पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी खटावमधील संबंधित महिलेच्या घरावर छापा टाकला. आठ दिवसांपूर्वी पुण्याहून खटावला येताना आरोपीने या महिलेला मोबाईलवरून ‘तुझ्या पिशवीत बॉम्ब ठेवलाय. गुपचुपपणे घरात नेऊन ठेव,’ असे सांगितल्यानंतर या महिलेने खटावच्या घरातील शोकेसमध्ये ही वस्तू ठेवून दिली होती.
खटावमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू
By admin | Published: December 24, 2016 11:36 PM