राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचना पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पुण्यातून वाहून येणा-या सांडपाण्यापैकी सुमारे ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे इंदापूर तालुक्याला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. या योजनेस २२ एप्रिल २०२१ रोजी तत्व:ता मान्यता देवून योजनेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व सर्वपक्षीय आमदार व पुढा-यांनी विरोध केल्याने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय रद्द केला. याच निर्णयाला तसेच सोलापूर जिल्ह्यातील ज्या आमदारांनी या योजनेला विरोध केला याचा निषेध करण्यासाठी आज इंदापूरच्या पश्चिम भागात बारामती-इंदापूर महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अंथुर्णे, आंनदनगर, जंक्शन, लासुर्णे व बोरी आदी भागातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत जंक्शन येथे अर्धनग्न होत बोंबाबोंबा आंदोलन करण्यात आले. तसेच लासुर्णे येथील बोरी चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी ‘पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’ अशा प्रकारच्या घोषणा देत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जोपर्यंत हा निर्णय मागे घेऊन आपल्याला हक्काचे पाणी मिळत नाही तोपर्यत संघर्ष करणार असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅड. तेजसिंह पाटील व छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष आमोल पाटील यांनी सांगितले. जंक्शन येथे माजी जि. प. सदस्य प्रताप पाटील व संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष सागर मिसाळ यांनी ‘पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’, ‘दत्तामामा तुम आगे बढो हम तुमारे साथ है’ आशा घोषणा दिल्या. यावेळी लासुर्णेचे सरपंच रूद्रसेन पाटील, उद्योजक विष्णू माने, छत्रपतीचे माजी उपाध्यक्ष बाळासो पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष लोंढे, दीपक लोंढे, निखिल भोसले, शेखर काटे, तुकाराम देवकाते, मनोज कुलकर्णी आदी उपस्थित होते.
------------------
फोटो ओळी : जंक्शन(ता. इंदापूर) येथे अर्धनग्न होत बोंबाबोंबा आंदोलन करून इंदापूरला उजनीचे पाणी मिळण्याच्या योजनेला स्थगिती मिळाल्याच्या निषेधार्थ बोंब मारताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी.
२१०५२०२१-बारामती-०२
----------------------------
फोटो ओळी : लासुर्णे येथे बारामती-इंदापूर महामार्गावर रास्ता रोको करताना कार्यकर्ते.
२१०५२०२१-बारामती-०३