पुणे : गेल्या काही वर्षांत कमी वयातच हाडे-सांधे दुखण्याचे प्रमाण वाढले आहे. थंडीच्या दिवसात तर हा त्रास अधिक जाणवतो. त्यासाठी काही आराेग्यविषयक नियमांचे पालन करणे गरजेचे ठरते. प्रामुख्याने व्यायाम, याेग्य आहार, सप्लिमेंटस व काही दुखणे असेल तर त्यावर उपचार घेतल्यास हा त्रास नक्कीच कमी करता येताे, असे अस्थिराेगतज्ज्ञ सांगतात.
कमी वयातच हाडे-सांधेदुखीकारणे काय?
- बदलती जीवनशैली...
बदलत्या जीवनशैलीमध्ये बैठे काम, व्यायामाचा अभाव, खाण्याच्या बदललेल्या वेळा आदी कारणांमुळे हाडे किंवा सांध्याच्या दुखण्यांचे प्रमाण वाढलेले आहे.
- आहारात कॅल्शियमची कमी
आहारात हाडांच्या पाेषणासाठी याेग्य प्रमाणात कॅल्शियम असणे गरजेचे असते. ते जर नसेल तर हाडे दुखण्याचे प्रमाण वाढत जाते. त्यासाठी डाॅक्टरांना विचारून कॅल्शियमच्या गाेळ्या घेणे गरजेचे असते.
थंडीच्या दिवसांत वाढतो त्रास
थंडीच्या दिवसांत वातावरणातील तापमान कमी हाेते व त्यामुळे मांसपेशी व स्नायू अकडतात. म्हणून, त्यांचे वाॅर्मअप करायला हवे.
नियमित व्यायाम आणि कॅल्शियमयुक्त आहार
त्याचबराेबर नियमित व्यायाम करायला हवा व कॅल्शियमयुक्त आहार किंवा सप्लिमेंटस घेणे गरजेचे ठरते. तसेच याेग्य ते प्राेटीन व व्हिटॅमिन्सदेखील तुमच्या डाॅक्टरांना विचारून घ्यावेत, असे अस्थिराेगतज्ज्ञ सांगतात.
सांधेदुखी, संधीवाताचा त्रास होत असल्यास कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, प्राेटीन्स पुरेसे घ्या
ज्यांच्यामध्ये प्राेटीन तसेच व्हिटॅमिन्सची कमतरता आहे त्यांच्यामध्ये थंडीत सांधेदुखी तसेच संधीवाताचा त्रास सर्वसाधारणपणे वाढताे. ज्यांना हा त्रास आधीपासून आहे त्यांनी कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, प्राेटीन्स पुरेसे घ्यावेत. याेग्य ताे आहार घ्यावा. तसेच व्यायाम करावा. जर काही त्रास असेल तर तुमच्या डाॅक्टरांकडे जाऊन उपचार करावेत. - डाॅ. आशीष अरबाट, अस्थिराेगतज्ज्ञ, जहांगीर हाॅस्पिटल