पुणे : हृदयविकार, रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा आनुवंशिक इतिहास असलेल्या कुटुंबातील ९० टक्के व्यक्तींना भविष्यात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता निर्माण होऊ शकते. तसेच येत्या काही वर्षांत त्यांना हाडांसंबंधी गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असल्याची माहिती एका पाहणीतून समोर आली आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण झाल्यास अन् त्यावर वेळीच उपचार न घेतल्यास हाडे ठिसूळ होणे, ऑस्टिओपाेराेसि व इतर आजारांचाही धाेका वाढतो.
पुण्यातील खासगी प्रतिबंधात्मक प्रयाेगशाळेने केलेल्या आनुवंशिक चाचण्यांच्या अहवालातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पुण्यासह इतर शहरांतील १० हजार व्यक्तींच्या लाळेचे नमुने आनुवंशिक चाचणीच्या (जेनेटिक टेस्ट) तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये १० ते ५० वर्षे वयोगटातील महिला व पुरुषांचा समावेश होता.
२४ टक्के व्यक्तींना सीएडीचा धाेका
या चाचणीतून २४ टक्के व्यक्तींना कोरोनरी आर्टरी डीसीज (सीएडी) म्हणजेच रक्तवाहिन्यांचे आजार हाेण्याचीदेखील शक्यता व्यक्त केली आहे. हा रक्तवाहिन्यांचा आजार आहे. यामध्ये शरीरातील रक्तवाहिन्या किंवा शिरा आकसतात. तसेच, रक्तवाहिन्यांच्या मार्गात कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियम जमा झाल्यामुळे जाड थरही जमा होतो. त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा येताे. तर, २९.५ टक्के व्यक्तींना उच्च एलडीएल म्हणजे ज्याला वाईट काेलेस्ट्राॅलचा धोकाही वर्तविण्यात आला आहे. काेलेस्ट्राॅल रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन त्यापासून हृदयविकाराचा धाेका निर्माण होतो.
‘व्हिटॅमिन बी’ची कमतरता
या चाचण्यांमधून ५७.५५ टक्के व्यक्तींना त्यांच्या आनुवंशिक रचनेनुसार व्हिटॅमिन बी १२ कमतरता हाेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच्या कमतरतेमुळे मेंदूविषयक म्हणजे बधीरता, विस्मरण, तोल जाणे, गोंधळ अशा समस्या निर्माण हाेऊ शकतात.
आनुवंशिक चाचणी काय आहे?
लाळेवर आधारित ही आनुवंशिक चाचणी (जेनेटिक टेस्ट) आहे. ती घरीदेखील करता येऊ शकते. भारतीय आनुवंशिकदृष्ट्या वेगवेगळे असून त्यांना अनेक आरोग्यसेवांचा आव्हानांचा सामना करावा लागतो. आनुवंशिक आजारांच्या वाढत्या प्रमाणासह मधुमेह व हृदयविषयक आजार यांसारख्या जीवनशैली संबंधित आजारांचे उच्च प्रमाण आहे. ही चाचणी असे आजार होण्याचा आनुवंशिक धोका ओळखण्यास मदत करू शकते.
‘बदलत्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात काेणत्या प्रकारचे शारीरिक धाेके आहेत, हे समजून घेण्यासाठी आनुवांशिक चाचणी करण्यात येते. खासकरून ज्यांच्या कुटुंबात आधीच रक्तवाहिन्यांविषयक आजार, हृदयविकार किंवा इतर जोखीम घटकांचा कौटुंबिक इतिहास आहे अशा व्यक्तींसाठी ही चाचणी उपयुक्त ठरते. त्यातून त्यांच्या भविष्यात हाेण्याची शक्यता असलेल्या आजारांचे व्यवस्थापन व त्यानुसार डॉक्टरांशी सल्लामसलत करून औषधोपचार आणि योग्य जीवनशैली निवडता येते आणि धाेका टाळता येताे.
- अमोल नाईकवडी, प्रमुख, इंडस हेल्थ प्लस.
या व्हिटॅमिनमुळे शरीरातील कॅल्शिअमची पातळी याेग्य राहण्यास मदत हाेते. तर कॅल्शिअमने हाडे, दात मजबूत होतात. साेबत स्नायूंची ताकद, मज्जातंतूंचे कार्य चांगले चालते. पोटातील कॅल्शिअम, पोटॅशिअम शोषून घेण्याचे काम व्हिटॅमिन डी थ्री करत असते.
- डाॅ. प्रवीण देवकाते, अस्थिराेगतज्ज्ञ, बीजे वैद्यकीय महाविद्यालय.