पुणे : विमा पॉलिसीवर बोनस मिळवून देण्याच्या आमिषाने शिवाजीनगर येथील एका ८४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. चार कोटी रुपये मिळविण्याच्या आशेने दीड कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले. यासाठी त्यांच्यावर आपले मुंबईतील घरही विकण्याची वेळ आली.याप्रकरणी विजय केशव कानिटकर (वय ८४, रा़ ज्ञानेश्वर सोसायटी, मॉडेल कॉलेजवळ, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ हा प्रकार २७ मार्च ते १३ नोव्हेंबर २०१८ दरम्यान आॅनलाईनच्या माध्यमातून घडला़ जुन्या विमा पॉलिसीवरील व्याज, लाभ व बोनस असा सर्व मिळून ३ कोटी रुपयांची रक्कम मिळवून देतो, असे सांगून सहा जणांनी कानिटकर यांना तब्बल १ कोटी ५१ लाख ९२ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी बद्री कैलास, सीताराम केसरी, चतुर्वेदी, अजय शर्मा, प्रीतम घोष आणि कोठारी अशी नावे सांगणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दिल्लीत एका सरकारी कंपनीत कामाला होते़ ते १९८३ मध्ये निवृत्त झाल्यानंतर पुण्यात राहायला आले़ त्यांना मुलगा आहे़ पण ते एकमेकांच्या व्यवहारात दखल देत नाहीत़ त्यांना गेल्या वर्षी मार्च महिन्यात फोन आला़ त्यात जुन्या विमा पॉलिसीवर व्याज मिळवून देतो़ इतक्या वर्षांचे शिल्लक राहिलेले व्याज, लाभ व बोनस असा सर्व मिळून चार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम होईल़ ही रक्कम तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल, असे त्यांना आमिष दाखविण्यात आले़चार कोटी रुपयांहून अधिक पैसे मिळणार, असे वाटल्याने कानिटकर ते सांगतील त्याप्रमाणे वेगवेगळ्या बँकेच्या खात्यांवर पैसे भरत गेले़ त्यासाठी त्यांनी मुंबईतील घर विकून पैसे भरले़ मार्च ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान त्यांनी एकूण १ कोटी ५१ लाख ९२ हजार ४०० रुपये भरले़ तरीही पैसे न मिळाल्याने शेवटी त्यांनी ही बाब मुलाला सांगितली़ तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले़ त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार अर्ज केला़ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे अधिक तपास करीत आहेत़
विमा पॉलिसीवर बोनसच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 2:25 AM