पुणे : आपण ज्यावेळी वृक्ष पाहतो त्यावेळी आपल्या मेंदुमध्ये वेगळ्या प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया होतात. यामुळे आपल्याला आनंदाची भावना होते. नवीन आनंद व त्याचा शोध घेण्याची प्रेरणा आपल्याला वृक्षांच्या माध्यमातून मिळते. बोन्साय वृक्ष म्हणजे अपूर्णांकाकडून पूर्णांकांचा प्रवास असल्याची भावना असून ही कला आपल्याकडे आता विकसित होण्याची गरज असल्याचे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वात मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुण्यातील बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरीधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (अॅडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी या विषयीची अधिकृत घोषणा करीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र एका कार्यक्रमात काळे यांना प्रदान केले. यावेळी राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन खात्याचे सचिव विकास खर्गे, राज्याच्या उद्योग विभागाचे उपसचिव संजय इंगळे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मणियार, पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, गिरीधारी काळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.मुनगंटीवार म्हणाले, बोन्सायचा समावेश महाराष्ट्र शासन कौशल्य विकास योजनेमध्ये करणार असून, त्यामध्ये अभ्यासक्रम तयार करण्यात येतील, तसेच रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला जाईल. सा-याच गोष्टी भारतामधून निर्माण झाल्या आणि त्या जगामध्ये गेल्या. जगभरात भारतीय गोष्टींमध्ये संशोधन सुरु आहे. प्राजक्ता काळे यांनी अशाच एका कलेला भारतामध्ये पुन्हा आणून देशाचे, राज्याचे आणि पुण्याचे स्थान जगामध्ये बोन्सायच्या माध्यमातून उंचावले आहे.प्राजक्ता काळे यांनी पुण्यात ३,३३३ बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो एकाच ठिकाणी प्रदर्शित केला आहे. यामध्ये देशविदेशातील १५० हून अधिक झाडांच्या जातींचा समावेश आहे. प्रास्ताविक करताना गिरिधारी काळे यांनी केले. इंडोनेशिया येथील बोन्साय मास्टर रुडी नजाओ आणि अनेक देशांमधील बोन्सायचे तज्ञ उपस्थित होते.
बोन्साय वृक्ष म्हणजे अपूर्णांकडून पूर्णाकांचा प्रवास : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 1:08 PM
प्राजक्ता काळे यांनी पुण्यात ३,३३३ बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो एकाच ठिकाणी प्रदर्शित केला आहे...
ठळक मुद्देपुण्याच्या बोन्साय मास्टर प्राजक्ता काळे यांचे गिनीज रेकॉर्डजगभरात भारतीय गोष्टींमध्ये संशोधन सुरु