पुणे : तरुणांच्यां देश असलेल्या भारतात तरुणाई व्यसनाधीन आहे, चंगळवादी आहे असे आरोप केले जातात. इतकेच नव्हे तर तरुणाईची संवेदनशीलता हरवत आहे असेही शेरे मारले जातात. पण असं काहीही नाहीये. अजूनही तरुण वाचतात. अगदी शिवाजी सावंत, विश्वास पाटील यांच्यापासून ते सुरेश भट, मंगेश पाडगावकर, संदीप खरे यांच्यापर्यँत येऊन सार काही वाचण्याची त्यांची इच्छा आहे. याचाच प्रत्यय येतो ते पुण्यात.
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या सध्या बुक कॅफेंची संख्या लक्षणीय वाढत आहे. पूर्वीसारखं टेबल-खुर्च्या, टाचणी पडेल इतकी शांतता आणि फक्त वाचन करणारे लोक असे वाचनालयाचे चित्र केव्हाच मागे पडले आहे. छान रंगीत बैठकव्यवस्था, स्वच्छ प्रकाश, टेबल खुर्च्यांसह, सोफे -उशा, गालिचे, गाद्या अशी आवडेल तशी बसण्याची सोय हल्ली बुक कॅफेत असते. आजूबाजूला लावलेली मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेतली पुस्तक आणि चहा, कॉफीसह काही हलकं -फुलकं खाण्याची सुविधा यामुळे बुक कॅफे तरुणाईला अधिक जवळचे वाटतात.
नेहमी बुक कॅफेत जाणारी ऐश्वर्या सांगते, मला बुक कॅफे इतर ठिकाणांपेक्षा कधीही जवळचा वाटतो. घरी न मिळणारी शांतता मला इथे मिळते. इथली पॉझिटिव्हिटी मला एनर्जी देते. ओंकार सांगतो, मी गेले सहा महिने एका बुक कॅफेत जातो. या काळात माझी जवळपास ८ ते १० चांगली पुस्तक वाचून झाली आहेत. मला नाही वाटत घरी हे शक्य झालं असत. आर्किटेक्ट झालेल्या कस्तुरीने सांगितलं की,माझी अनेक सबमिशन ड्रॉइंग मी कॅफेत पूर्ण केली आहेत. मी आजही बुक कॅफेत जाते, तिथे मला माझी स्पेस मिळते.
वर्ड अँड सिप कॅफेचे एजाज शेख सांगतात, आमच्याकडे सर्व वयाचे ग्राहक येतात.त्यात अगदी आज्जी-आजोबाही आहेत मात्र तरुणांची संख्या लक्षणीय आहे.आजचे तरुण केवळ वाचत नाहीत तर अत्यंत सजगतेने वाचतात. ते कपडे, गाडी, मोबाइलप्रमाणे स्वतःच्या आवडीच्या पुस्तकांची मागणी करून वाचतात असा आमचा अनुभव आहे.