लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या ‘कर हर मैदान फतेह’ या आत्मचरित्रपर पुस्तकाला वाचकांची विशेषत: तरुणाईची प्रचंड मागणी आहे. या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदी भाषांतरासंबंधी नुकतेच करार झाले असून लवकरच हे पुस्तक या दोन्ही भाषेत वाचकांना उपलब्ध होणार आहे.
‘कर हर मैदान फतेह’ हे पुस्तक जानेवारीमध्ये प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर पंधरा दिवसांतच या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदी अनुवादासाठी तीन राष्ट्रीय प्रकाशन संस्थांचे प्रस्ताव आले. यापैकी हार्पर कॉलिन्स इंडियाचा प्रस्ताव स्वीकारला, असे मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी सांगितले.
इंग्रजी आणि हिंदी अनुवादासोबतच या पुस्तकाच्या इतर भारतीय भाषांतील अनुवादाबाबतही प्रकाशकांशी बोलणी सुरू आहेत. जानेवारी महिन्यात हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी प्री-बुकिंग घेतले होते. या बुकिंग दरम्यानच पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली. प्रकाशनानंतरच्या एका महिन्यात पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाल्याचे मेहता यांनी सांगितले. कोरोनाच्या प्रभावातून अजूनही प्रकाशन व्यवसाय पुरेसा सावरलेला नाही. अशात एखाद्या पुस्तकाच्या महिन्याभरात तीन आवृत्त्या निघणे हे आशादायक चित्र असल्याचे ते म्हणाले.
-------------------------------------------------------------------------------