पुणे : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी बालभारतीने सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाचा समावेश असलेले एकच पुस्तक काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील काही शाळांमध्ये सुरूवातीला हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. यामध्ये पहिली ते पाचवी या इयत्तांमध्ये गणित आणि विज्ञान हे विषय श्किणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तकांची निर्मिती एक पथदर्शी प्रकल्पही बालभारतीने आणला आहे.
दोन वर्षांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ‘एक पुस्तक, एक वही’ ही अभिनव कल्पना राबविली होती. या प्रकल्पाची सुरूवात २६ जानेवारी २०१८ पासून प्रत्यक्ष शाळांमध्ये करण्यात आली. याविषयी ‘लोकमत’ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. हीच संकल्पना बालभारतीने यापूर्वीच काही शाळांमध्ये सुरू केली आहे.
एका शाळेतील सहावीच्या ५० विद्यार्थ्यांची पुस्तके चार भागात विभागली होती. सर्व विषय एकाच स्पायरल बायंडिंग केलेल्या फाईलमध्ये समाविष्ट करून एकच पुस्तक तयार केले होते. सर्व पुस्तके व या एका पुस्तकाचे वजन यामध्ये खूप फरक होता. याबाबत शाळांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने सातत्याने प्रयत्न केले आहे. तसेच ‘लोकमत’नेही याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. ‘बालभारती’च्या निर्णयामुळे या संकल्पनेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
वह्यांच्या ओझ्याकडे लक्ष द्या
बालभारतीने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. तीन टप्प्यात पुस्तके येणार असल्याने निश्चितच दप्तराचे ओझे कमी होणार आहे. पण पुस्तकांचे ओझे कमी होत असताना वह्यांच्या ओझ्याकडेही लक्ष द्यायला हवे. ही शाळांची जबाबदारी असेल. पुस्तकाप्रमाणेच ‘एकच वही’ ही संकल्पना राबविण्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यायला हवा, असे ‘वैशंपायन परिवार’चे सुहास वंशपायन यांनी सांगितले.