लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गावातील वाचनालय, आचार्य प्र. के. अत्रेंचे ‘मी कसा झालो’ या पुस्तकाने मला गावाबाहेर काढले. खरे तर पुस्तकानेच माझा कानामागील प्रदेश सुपीक केला. या शिवाय तमाशा, व्यंगचित्र, दिवाळी अंकातील कविता आणि भोवतालचे जग यामुळेच मी घडलो, अशा शब्दांत भाष्यकवी रामदास फुटाणे यांनी भावना येथे व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे माधवराव पटवर्धन सभागृहात मंगळवारी आयोजित ‘मसाप गप्पा’ या उपक्रमात ते बोलत होते. मसापच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यावेळी उपस्थित होते. अत्रे, दत्तू बांदेकर यांचे लेखन.. आवाज... दीपावली आणि रत्नदीप यांसारखे दिवाळी अंक वयाच्या बाराव्या वर्षी वाचनात आले. अत्रेंच्या ‘मी कसा झालो’मुळे मी भारावून गेलो. त्या वेळी राज्यावर साहित्यिकांचेच राज्य होते. त्यांच्या शब्दाला मान्यता होती. त्यांनी आणि गावातील लोकमान्य वाचनालयाला मला घडविण्याचे श्रेय जाते. या शिवाय त्या वेळी दर आठ-पंधरा दिवसांनी तमाशा पाहायचो. विठाबाई नारायणगावकर आणि लीला गांधी या तर आमच्या माधुरी दीक्षित किंवा कॅटरिना कैफच म्हणा ना! अशा भोवतालामुळे घडत गेल्याचे फुटाणे म्हणाले.
पुस्तकाने काढले गावाबाहेर
By admin | Published: May 10, 2017 4:22 AM