युगंधर ताजणे पुणे : सोशल माध्यमांमध्ये पूर्णपणे गुरफटून गेलेल्या तरुणाईला वाचनाची गोडी जेमतेम राहीली असताना दुसरीकडे लहान मुलांना पुस्तकाच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या जगाची सफर घडवून आणण्याचे काम ’’पुस्तककाका’’ करीत आहेत. गेल्या २० वर्षांपासून सुरु असणारा त्यांचा हा उपक्रम लहानग्यांना वाचनाची आवड जोपासण्यास मदत करीत असून त्या आवडीतून त्यांचे वाचनकौशल्य कसे वाढीस लागेल याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ’’बुकअंकल’’ सदैव मदत करण्यासाठी तयार असतात हे विशेष .. के.एस.विश्वनाथन अय्यर वीस वर्षापूर्वी कोईम्बतूर मधून पुण्यात आले. त्यांनी आपली वाचनाच्या आवडीचे रुपांतर एका नवीन व्यवसायात केले. तो म्हणजे लहान मुलांना वाचण्याक रिता पुस्तके उपलब्ध करुन देणे, एकदा का पालकांनी अय्यर काकांचे फिरते ग्रंथालयाचे सभासदत्व घेतल्यानंतर त्यांना महिन्याकाठी २० पुस्तके दिली जातात. यावेळी अय्यर हे पालकांना पाल्याला क शापध्दतीने वाचनाचे धडे द्यायला हवे याचे प्रशिक्षण देतात. लहान मुलांच्या कलेनुसार त्यांच्यात वाचनाची आवड जोपासण्याकरिता सतत प्रयत्नशील कसे राहावे, मुलांच्या प्रश्नांना कशा पध्दतीने उत्तरे द्यावीत याविषयीचे मार्गदर्शन ते करतात. एकदा का अय्यरकाकांच्या ग्रंथालयाची मेंबरशीप घेतली की ती मग घरातील इतर लहान मुलांक रिता लागु होते. त्यांच्या ग्रंथालयाकडून देण्यात येणारी पुस्तके बाहेरील दुकानात कुठेही भेटत नसल्याने दिल्ली, उत्तरप्रदेश,केरळ, यासारख्या इतर अनेक शहरांमधून वेगवेगळ्या प्रकाशकांकडून ती पुस्तके मागून घेतात. वय वर्षे तीन ते दहा वर्षाच्या आत जर लहान मुलांना वाचनाची गोडी लागली तर ती पुढे आयुष्यभर त्यांना सोबत करते. सुरुवातीच्या काळात त्यासाठी पालकांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. ब-याचदा लहान मुलांच्या हातात जी पुस्तके पडायला हवीत ती न पडल्यामुळे त्यांच्या मनात वाचनाविषयी अनास्था तयार होत असल्याचे अय्यर सांगतात. दहा वर्षापूर्वी अय्यर यांनी पुणे जिल्हयातील अंगणवाडी सेविकांसाठी वाचनकौशल्य नावाचा उपक्रम हाती घेतला. या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून वाचनप्रक्रिया लहान मुले व त्यांच्या पालकांपर्यत पोहचविण्यावर भर देण्यात आला. आजकाल आपल्या घरांमध्ये टीव्ही, उंची फर्निचर, वाय फाय, यासारख्या सर्व सोयीसुविधा आहेत. मात्र पुस्तके ठेवण्यासाठी बुकशेल्फ नसल्याने त्यांच्याविषयी आत्मीयता वाटत नाही. अय्यर यांनी लहान मुलांमधील वाचन कौशल्य विकसित व्हावे यासाठी 4 स्तर तयार केले असून त्यात पहिला स्तर शब्द, दुसरा वाक्ये आणि तिसरा स्तर चित्रांचा, सर्वात शेवटी वाचनक्षमता तपासणे या चौथ्या स्तराचा समावेश आहे. यांच्या माध्यमातून लहान मुलांशी संवाद साधून त्यांच्यातील वाचनगोडी वाढविण्यावर भर दिला जातो.
* ३५०० पालकांपर्यत पुस्तके पोहचविली...लहान मुलांच्या भावविश्वाची पूर्णपणे माहिती असलेल्या अय्यरकाका स्वत:च पुस्तकांची निवड करतात. यात पालकांना हस्तक्षेप करु दिला जात नाही. यामुळे त्या लहानमुलांच्या वाचनप्रक्रियेवर परिणाम होतो. आई-वडिलांनाच जर पुस्तकाची गोडी नसेल तर पालकांत ती येणे अवघड आहे. मात्र तरीही लहानपणापासून त्यांच्या वाचनाची काळजी घेतली गेल्यास भविष्यात त्याचा सकारात्मक फायदा दिसून येतो. ५७ वर्षाच्या अय्यरकाकांनी आतापर्यत ३५०० लोकांना पुस्तके दिली आहेत.