पुणे : बनावट वेबसाइटवर इलेक्ट्रिक बाईक बुक केल्याने पुण्यातील अभियंत्याची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पुण्यातील एका ७१ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. २०) लष्कर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पुण्यातील कॅम्प परिसरातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेने लष्कर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार हा प्रकार १५ ऑगस्ट २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२४ यादरम्यानच्या काळात घडला आहे. त्यानुसार महिलेने सिम्पल वन कंपनीच्या वेबसाइटवरून एक इलेक्ट्रिक मोटारसायकल बुक केली. त्यानंतर त्यांनी बाईक कधीपर्यंत मिळणार आहे हे विचारण्यासाठी वेबसाइटवर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधला.
त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉट्सॲपवर फोन करून इलेक्ट्रिक बाईक विकणाऱ्या कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवले. तुमची बाईक बुक झाली आहे. पुढची प्रोसिजर करण्यासाठी पैसे भरावे लागतील असा तगादा लावला. सांगितल्यानुसार महिलेने तीन वेगवेगळ्या खात्यावर एकूण १ लाख ३८ हजार रुपये ट्रान्सफर केले. परंतु इलेक्ट्रिक वाहन मिळाले नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कांबळे हे करत आहेत.