सर्जनशील ज्ञानप्राप्तीसाठी वाचन, विचार आणि कल्पनाशक्ती या प्रमुख पायऱ्या समजल्या जातात. वाचनाने ज्ञान प्राप्त तर होतेच, पण विचारांची दालनेही खुली होतात. असं म्हणतात की, आपल्या आवडीच्या-निवडीच्या विषयांवर आवर्जून केलेलं वाचन हे खरं वाचन. आजच्या संदर्भात सांगायचे तर फावल्या वेळी वा उदासी घालवण्यासाठी अथवा मन रिझवण्यासाठी व्हाॅटस ॲप, ट्विटर, नेटसर्फिंगशिवाय जो कथा, कादंबरी, काव्य आदी वाचनास प्राधान्य देतो, तो खरा वाचक.
वाचनाची सवय खरं तर अंगीकारणे आवश्यक आहे. वाचन हा एक मूकसंवाद असून, त्यातून निश्चितपणे प्रगती होते. त्यामुळे आपण कितीही धावपळीत असलो, तरी दिवसातून एक तास तरी मनापासून वाचनासाठी दिला पाहिजे. ग्रंथ हे विचारांना दिशा देतात, जगण्याला आयाम देतात. खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवतात. नवीन सुचण्याची प्रेरणा ग्रंथ वाचनातून वृद्धिंगत होते.
महात्मा ज्योतिबा फुले या द्रष्ट्या क्रांतिसूर्याने एके ठिकाणी म्हटले आहे की, शरीर आणि भौतिक सुखाची साधने गोळा करण्यासाठी द्रव्य वेचण्याऐवजी तोच पैसा ग्रंथखरेदीसाठी सत्कारणी लावावा. हे आवाहन करताना ते म्हणतात,
थोडे दिन तरी मद्य वर्ज करा। तोच पैसा भरा ।। ग्रंथासाठी।।
ग्रंथ वाचिताना मनीं शोध करा। देऊं नका थारा।। वैरभावा।।
महात्मा फुले यांचे हे आवाहन अंगीकारणे तर सोडूनच देऊ, पण कानावरही फारसे पडले नसतील. यात काहीसे तथ्य असले तरी मुळात वाचनाकडे असणारा ओढा एकंदरीतच ओहोटीस लागला आहे किंवा काय, अशी शंका यावी असेच सध्याचे चित्र असल्याचे वारंवार म्हटले जाते. आजचे वाचन हे तात्पुरते, मतलबी आहे. या वाचनाने "मला ताबडतोब काय फायदा होईल?" असे तरुणांचे म्हणणे असते, असेही बोलले जाते. आताची पिढी वाचत नाही, अशी ओरडही सुरू असते. पण हे तितकेसे खरं नाही. कारण त्यांनी काय वाचावे, वाचनातून काय मिळते, हे तरुणाईपर्यंत नीटसे पोहोचतच नाही. चार दशकांपूर्वी वाचनाकरिता पुस्तक हे एकच माध्यम उपलब्ध होते. त्यामुळे अनेकांच्या घरामध्ये पुस्तकांचा मोठा संग्रह होत असे. परंतु आता बदलत्या काळानुसार घरोघरी दूरचित्रवाणी, संगणक, मोबाईल, किंडल यांसारखी साधने ज्ञान मिळविण्याकरिता वापरली जात आहेत. त्यामुळे आजची पिढी जरी पुस्तके हातात घेऊन वाचण्यास तेवढी तत्पर नसली, तरीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाची शिदोरी गोळा करण्याकरिता वाचनाची आजच्या काळातील माध्यमे तरुणांकडून मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. नव्या युगातील डिजिटल तंत्रज्ञानामुळे वाचनसंस्कृतीही बदलली आहे. पुस्तकांसोबत ई बुक, ई माध्यमे, ऑडिओ- बुक्स, ब्लॉग, फेसबुक, स्टोरी टेल आदी अनेक माध्यमांतून लिहिले जाते, बोलले जाते. संगणक, लॅपटाॅप, मोबाईलवर ते वाचले जाते. या माध्यमातूनही चांगल्याची निवड कशी करायची हे त्यांना सांगितले तर नववाचक घडविला जाईल. ग्रंथापर्यंत वाचक येत नसेल तर वाचकापर्यंत ग्रंथ गेले पाहिजेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा वाचन साधनातूनही सकस, दर्जेदार साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे. वाचक कधीच चांगला वाचक असत नाही. तो घडावा लागतो, घडवावा लागतो.
यंदाचाही जागतिक ग्रंथ दिन गेल्या वर्षीप्रमाणेच कोविडच्या सावटाखालीच संपन्न होणार आहे. याकाळात घरात अडकून पडलेल्या सर्वांचीच चमत्कारिक अवस्था होत आहे. या संभ्रमित अवस्थेत सकारात्मक ऊर्जा देण्याची ताकद पुस्तकांमध्ये नक्कीच आहे. पण अनेक घराघरांमध्ये सुखसोयींयुक्त अनेक गोष्टींची उपलब्धी आहे, पण एखादे वाचनीय पुस्तक संग्रही असावे अशी मानसिकता नाही, असे आढळून आले आहे. त्यामुळेच अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच ग्रंथसुद्धा मानवाची मूलभूत गरज असल्याचे आता मान्य केले पाहिजे. त्यामुळेच आवर्जून नमूद करावेसे वाटते की, घरात माणसं राहतात तशी पुस्तकही असलीच पाहिजेत. पुस्तकांनाही प्रत्येकाच्या वैयक्तिक संग्रहात स्थान मिळाले पाहिजे. व्यक्तिगणिक एकेका पुस्तकानं त्यात भर पडली तर घरातच छानसं ग्रंथालय बनत जाईल. ग्रंथांच्या अस्तित्वाने घर अधिक समृद्ध होईल. दरमहा वा विशिष्ट कालावधीत प्रत्येकानेच ग्रंथ, पुस्तकांची खरेदी करणे आपले कर्तव्य मानले पाहिजे. ज्यांना ग्रंथ खरेदी शक्य नाही, अशांना ते भेट दिले पाहिजेत. ग्रंथांमुळे केवळ शब्दसंपदा नाही तर विचारही समृद्ध होतात. त्यासाठीच 'घरोघरी असावी ग्रंथसंपदा' ही जीवनावश्यक गरज मानली तर 'जागतिक ग्रंथदिवस' हा केवळ एका दिवसाचा उपचार न राहता तो जगण्याचा एक अविभाज्य भाग बनेल.