वाचन, लेखन व गणित हा पाया पक्का असेल, तर तो माणूस जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. वाचनाबाबतची वैचारिक बैठक, वाचन कौशल्य आत्मसात करण्याची विविध तंत्रे केवळ विद्यार्थ्यांनाच नाही; तर शिक्षकांनी व पालकांनीही माहीत करून घेतली पाहिजेत. त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त होईल, असा विश्वास वाटतो. मुळात वाचन संस्कारावर अत्यंत कमी पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे सतीश पोरे यांनी ‘वाचन संस्कार’ या विषयावर पुस्तक लिहून शिक्षण क्षेत्रात एक मोलाची भर टाकलेली आहे. या पुस्तकाचा मुख्य उद्देश प्राथमिक शालेय स्तरावर वाचन कसे शिकवावे, हा आहे. वाचन कौशल्यासंबंधी जे काही माहीत आहे, ते प्राथमिक शिक्षकांना, तसेच पालकांना व सर्वसामान्य वाचकांना सांगावे, या जाणिवेतून हे पुस्तक लिहिलेले आहे.
पुस्तकाचे नाव : वाचन संस्कार
लेखक : सतीश पोरे
प्रकाशन : अर्चना ग्रंथ वितरण
-------------------------------
रामायणातील खलनायिकेवरील लक्षणीय कादंबरी
महाकाव्यातील पात्रांवर कादंबरी लिहिणं तसं सोपं नाही. त्यासाठी खूप अभ्यास असावा लागतो. कैकेयीसारख्या खलनायिका ठरविल्या गेलेल्या पात्रावर तर लेखन करणे आणखीनच कठीण आहे. ही कादंबरी वाचताना डॉ. नि. रा. पाटील पिळोदेकर यांचा रामायणावर सखोल अभ्यास दिसून येतो. त्यांनी कादंबरीचे मुख्य पात्र कैकेयीबरोबरच तिचे पिता अश्वपती, पती दशरथ महाराज, भगिनीसारखी सवत कौसल्यादेवी, शीघ्रकोपी सत्यान्वेषी पुतण्या लक्ष्मण, त्याची विरहिणी पत्नी उर्मिला, पुत्र भरत यांच्या मनोगतांतून ही कादंबरी उभी केली आहे. कैकेयी युद्धनिपुण, व्यवहारकुशल, पतीपरायण, अनेक विद्या पारंगत अशा असाधारण वैशिष्ट्यांनीयुक्त होती. या कादंबरीशिवाय त्यांनी श्रीरामांचा प्रतिहार लक्ष्मण, श्रीरामाग्रजा शांता आणि लक्ष्मणपत्नी विरहिणी उर्मिला यांच्यावरही कादंबऱ्या लिहिल्या आहेत. महाभारतातील दुर्लक्षित पात्र विदूर यांच्यावरही त्यांनी कादंबरी लिहिली आहे. कैकेयीचे मिथक वापरण्यापासूनच या कादंबरीचे वेगळेपणे लक्षात येते. निवेदनतत्रांचे वेगळेपणे, रामायणकालीन भाषेची निर्मिती, पौराणिक वास्तवाचा अनेक अंगांनी घेतलेला शोध यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे.
पुस्तकाचे नाव : कैकेयी
लेखक : डॉ. नि. रा. पाटील पिळोदेकर
प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
-----------------------
हॉटेल कामगाराच्या आयुष्याचा दाहक पट
परमिट रूम, बार, हॉटेल ही छंदीफंदी लोकांची भुरळ घालणारी दुनिया. हे एक स्वतंत्र जग असते. तिथे झगमगाट, उच्चभ्रूचा वावर आणि अय्याशी फेर धरत असते; तर दुसऱ्या बाजूला रोजीरोटीला महाग झालेले गोरगरीब, शोषित, पीडित लोक या दुनियेत स्वत:ला हरप्रकारे जाळून नेस्तनाबूत करत असतात. भारतासारख्या देशातील दोन वर्गांतील दरी पाहायची असेल, तर आपल्या जवळपासचे परमीट रूम, बार, हॉटेल हे एक उत्तम अनुभवक्षेत्र असते. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कामगाराच्या आयुष्याचा पट रमेश रावळकर यांनी 'टिश्यू पेपर' या कादंबरीत चित्रित केलेला आहे. शोषितांच्या जगण्याचे भयावह रूप आपल्याला या कादंबरीत वाचावयास मिळते. मराठी साहित्यात अपवादानेच चित्रित होणारे अर्थशास्त्रीय वास्तव प्रकर्षाने वाचकास टोचण्या देऊ लागते. श्रीमंत, गर्भश्रीमंत, उच्चमध्यमवर्ग, मध्यमवर्ग, सामान्य माणूस आणि अतिसामान्यांचे गूढ विश्व हा लेखक ‘टिश्यू पेपर' या कादंबरीत आपल्यासमोर ठेवतो. माणूस होण्यासाठी ज्यांना ज्यांना डागण्या देणे गरजेचे आहे; त्या सर्वांना डागण्या देत कधी खोलवर जखम करत ही कादंबरी आपल्याला अस्सल साहित्यकृती वाचल्याचा अनुभव देते. प्रत्यक्ष जगलेले जीवनानुभव साहित्यात जसेच्या तसे ओतून एक जिवंत कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न रमेश रावळकर यांनी ‘टिश्यू पेपर’ या कादंबरीत केलेला आहे.
पुस्तकाचे नाव : टिश्यू पेपर
लेखक : रमेश रावळकर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
------------------------
आयएएस होऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ४१
तुम्हाला भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) जायचंय? तुम्ही यूपीएससी सनदी परीक्षांसाठीची तयारी करत आहात? तर हे पुस्तक तुमच्यासाठी उपयोगी आहे. कारण आयएएसच्या पाऊलवाटेवर हे पुस्तक तुमचे बोट धरून तुमची सोबत करेल.. यूपीएससीच्या पूर्व व मुख्य परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम, उपयुक्त संदर्भ-साहित्य आणि अभ्यासाची दिशा याचे नेमके मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. अभ्यासाविषयी अतिशय महत्त्वाच्या व परिणामकारक टिप्स या पुस्तकात आहेत. आयएएसच्या वाटेवरील कठीण आव्हान म्हणजे मुलाखत व्यक्तिमत्त्व चाचणी! या आव्हानाला सामोरे जाण्यासाठीचा यशस्वी मंत्र देणारे हे पुस्तक आहे. संकेत भोंडवे यांच्या स्वानुभवावर आधारित हे पुस्तक आहे. भोंडवे स्वतः आयएएस अधिकारी असून, ते या प्रक्रियेतून गेलेले आहेत. प्रशासकीय सेवेचा एक दशकाचा प्रवास, राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम व त्यासाठी प्राप्त झालेले राष्ट्रीय व राज्य पुरस्कार अशी श्री. भोंडवे यांची ही यशोगाथा तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
पुस्तकाचे नाव : ‘आयएएस’ची पाऊलवाट
लेखक : संकेत भोंडवे
प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
------------