पुण्याच्या शिवाजीनगर भागात राहणारी चंदला मनोहर कुलकर्णी ही तरुणी मॉडर्न कॉलेजमधून पदवीधर झाली. कॉस्ट अकाउंटंट असल्यामुळे आर्थिक व्यवस्थापन हा तिच्या विशेष अभ्यासाचा व आवडीचा विषय बनला. कॉटन ग्रीव्हज कंपनीत ऑडिट ऑफिसर म्हणून सुमारे चार वर्षांचा अनुभव घेत असतानाच लग्न होऊन ती बनली श्रुती जयंत गोखले! पुण्याची ही तरुणी आज 40 वर्षांनंतर दुबईतील प्रख्यात कंपनीची पार्टनर व मॅनेजिंग डायरेक्टर झाली असून, कंपनीची एक हजार कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल होत आहे.
1982 मध्ये पतीसमवेत त्या ओमानला गेल्या. तेथे उपेंद्र एम. किणी यांच्या सिव्हिलको या कंपनीत व नंतर 1987 मध्ये दुबईत लिंक मिडल ईस्ट लि. ही कंपनी स्थापन करून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. आर्थिक व्यवस्थापनातील कौशल्यामुळे त्या कंपनीच्या भागीदार बनल्या. तेव्हा सुमारे 30 कर्मचारी असणाऱ्या या कंपनीत आता दोन हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. त्यामध्ये बहुतांशी भारतीय असून, 200 हून अधिक इंजिनिअर आहेत. ही कंपनी दुबईमधील रोजगार देणारी तिसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली आहे.
देशांमधील सीमा तसेच विमानतळ, लष्करी आस्थापना आदी अनेक ठिकाणी आवश्यक असणारे स्टील तारांचे (वायर्स) कुंपण तयार करण्याचा या कंपनीचा व्यवसाय 75 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि वार्षिक उलाढालही एक हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून व भागीदार म्हणून श्रुती गोखले यांनी कंपनीला जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून दिला. नुकताच यावर्षी 31 जानेवारी रोजी दुबईत ऑनलाइन झालेल्या विश्व मराठी संमेलनात ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले गेले.
दीर्घ काळ परदेशात राहूनही अतिशय शुद्ध मराठीतच त्या बोलतात. त्या म्हणाल्या, ‘जागतिक दर्जाची दुबईतील भारतीय कंपनी हा नावलौकिक आम्ही मिळवला, टिकवला व त्यात शेकडो भारतीय नोकरी करीत आहेत. कंपनीचे संस्थापक उपेंद्र एम. किणी हे माझे मार्गदर्शक, गुरू आणि दुबईमधील पालक बनले होते. त्यांच्या निधनानंतर या कंपनीची जबाबदारी मी सांभाळत आहे ते केवळ मला मिळालेला अनुभव व शिकवणीमुळेच !’
त्या म्हणाल्या, ‘मी जरी दुबईत राहत असेल तरी माझे भारताशी, महाराष्ट्राशी आणि पुण्याशी असणारे भावनिक नाते कायम राहिले आहे. पुण्यात येताना गुढीपाडवा, नवरात्र, दिवाळी या आपल्या सणांच्या काळात शक्यतो येण्याचा मी प्रयत्न करीत असते. उद्योगातील यशाबरोबरच सामाजिक कार्याची जोडही आम्ही दिली असून, म्हैसूर येथे आमच्या शैक्षणिक प्रतिष्ठानमार्फत गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण, केरळमधील वेश्यांच्या मुलांचे शिक्षण व तेथे निराधार मुलांचे केंद्र संस्थेतर्फे चालू आहे. पुण्यातही प्रतिष्ठानतर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी प्रकल्प राबविण्याची योजना मनात आहे.
-
(संदर्भ : प्रवीण. प्र. वाळिंबे)