पुणे : कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासाेबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी ६० पथकांची शोधमोहीम देखील सुरु होती. तर दोघांची स्केचही तयार करण्यात आले होते. अखेर या शोधमोहीम मध्ये पुणेपोलिसांना यश आले असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर दोघांचा शोध सुरु असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
गुरुवारी (दि. ३) रात्री तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात फिरायला गेले होते. रात्री अकराच्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले हाेते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिघे जण पसार झाले. घाबरलेल्या तरुणीला मित्राने रुग्णालयात दाखल केले होते. त्या तिघांसाठी पोलिसांनी ४० गावे पालथी घातली होती. तसेच सराईतांची चौकशीही सुरु होती. आता सिसिटीव्हीच्या माध्यमातून एकाचा शोध घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
थोड्याच वेळात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल होणार आहेत. या घटनेनंतर त्यांच्यावरही विरोधकांकडून टीका केली जात होती. तसेच पुण्याच्या गुन्हेगारीबद्दल अनेक सवालही उपस्थित केले होते. आताही देवेंद्र फडणवीस यांना या घटनेबाबत प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. बोपदेव घाटातील घटनेला इतके दिवस उलटून गेले आहेत. पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करूनही तीन गुन्हेगारांना पकडू शकले नाहीत. त्यांची ६० तपास पथके या तिघांचा शोध घेत आहेत.
घटनास्थळापासून जवळ असलेल्या सुमारे ४० छोट्या - मोठ्या गावांमध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली आहे. त्या गावांतील ढाबे, दारू विक्रेते, लपूनछपून अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडे चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे. पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक हॉटेलवरील सीसीटीव्ही तपासले. मात्र, त्यामध्ये पूर्ण रस्त्यावरील परिसर दिसत नसल्याने अडचणी येत आहेत. सासवड, राजगड पोलिसांची देखील मदत घेण्यात येत असून पोलिसांकडून आरोपींचा माग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंधरा दिवसांमध्ये बोपदेव घाटमार्गे गेलेल्या सुमारे ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. याशिवाय यापूर्वी शहरातील प्रमुख टेकड्या, घाट परिसरात विनयभंग, बलात्कार, दरोडा असे गंभीर गुन्हे केलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली आहे.