पुणे : बोपदेव घाटात आपल्या मित्रांसमवेत फिरायला जाणे त्या सर्वांना चांगलेच महागात पडले. घाटात फिरायला गेल्यानंतर एका टोळक्याने मोटारीमधील व्यक्तींना दगडाने मारहाण करण्याचा धाक दाखवून सोन्याच्या अंगठ्या व सोनसाखळी असा ९५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संकेत मोहन मारणे, सूरज पांडुरंग जाधव (दोघेही वय २१, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या इतर सहा ते सात साथीदारांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मोहमद कुरेशी (वय ४०, रा. कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व्यावसायिक असून ते त्यांच्या मित्र-मैत्रिणीसह बुधवारी सायंकाळी मोटारीमधून बोपदेव घाट सासवड परिसरात फिरायला गेले होते. रात्री परतत असताना बोपदेव घाटात लघुशंका आल्याने त्यांनी मोटार रस्त्याच्या बाजूला उभी केली होती. दरम्यान, संकेत मारणेसह इतर आरोपी तेथे दाखल झाले. त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली, तसेच मोटारीमधील त्यांच्या सहकारी महिलेस दगडाने मारण्याचा धाक दाखवून तिच्या बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि त्यांच्या मित्राच्या गळ्यातील सोनसाखळी असा ९५ हजारांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. तसेच आरोपींनी तेथून जाताना कारवर दगडफेक केली आणि मोटारीचे नुकसान केले. नागरिकांना लुटल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने संकेत व सूरज या दोघांना अटक केली आहे. त्यातील एक आरोपी एक इलेक्ट्रॉनिक कंपनीत नोकरी करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील त्यांच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
बोपदेव घाटात फिरायला जाणे पडले महागात; ९५ हजारांचा ऐवज लुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 11:08 AM