गराडे : बोपगाव ( ता. पुंरदर ) येथील प्रतिमांढर समजले जाणाऱ्या काळुबाई देवीचा उत्सव १२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्सवास पुरंदर तालुक्यातील विविध गावांतून हजारो भाविक व महिलांनी उपस्थिती लावली. काळूबाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. ११ जानेवारी रोजी बोपगाव येथून पालखी व काठीने गावच्या बाजूस असलेल्या काळुबाई मंदिराकडे ढोल - ताशाच्या गजरात यात्रेसाठी प्रस्थान केले, त्यानंतर पालखी मंदिरात विसावली. रात्री ढोल- लेझीमचा छबिना झाला. १२ जानेवारी रोजी मंदिरात पहाटे महापूजा व अभिषेक झाला. दुपारी १ वाजता पालखी व काठीची मंदिर प्रदक्षिणा झाली. या वेळी ‘काळुबाईच्या नावाने चांगभलं’ चा जयघोष करीत भाविकांनी गुलालाची उधळण केली. या वेळी कानिफनाथांची व काळुबाईची आरती झाली. या वेळी महिला भाविकांची मोठी उपस्थिती होती. मंदिर प्रदक्षिणेनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. या वेळी पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश फडतरे, पुरंदर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक निवृत्ती फडतरे, माजी सरपंच बाजीराव जगदाळे, खंडू फडतरे, अनंतराव फडतरे, कानिफनाथ फडतरे, माजी उपसरपंच प्रकाश फडतरे, शहाजी शिंदे, बाळासाहेब फडतरे, बापूसाहेब फडतरे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब गुरव, विश्वास फडतरे, मुकेश सुराणा उपस्थित होते.(वार्ताहर)
बोपगावला काळुबाईचा जन्मोत्सव
By admin | Published: January 13, 2017 2:03 AM