- प्रशांत ननवरे बारामती : जन्मदात्रीने भर थंडीत आपल्या नवजात बालकाला सोडून दिले. या बालकाच्या रडण्याच्या आवाजाने संपूर्ण माळेगाव शहारले. या बालकाच्या आईने निष्ठुरता दाखवून बाळाला सोडले असले, तरी जागरूक नागरिकांसह पोलिसांनी दिलेली मायेची ऊब या अर्भकासाठी जीवनदायी ठरली.दोन-तीन दिवसांपासून तपमान कमालीचे घसरले आहे. गुलाबी थंडी बोचरी बनली आहे. त्यातच शुक्रवारी (दि. १४) पहाटेपासून ढगाळ हवामान होते. या हवामानामुळे हुडहुडी भरविणारी थंडी पहाटेपासूनच होती. याच थंडीत नकोशा झालेल्या नवजात अर्भकाला त्याच्या मातापित्यांनी माळेगाव कॉलनी येथील वडापावच्या गाड्यावर सोडून दिले. उबदार कपड्यात गुंडाळलेल्या या अर्भकाने फोडलेल्या टाहोने या परिसरात रस्त्यावरून जाणारी वाहतूक थबकली. रडणाऱ्या या अर्भकाला पाहून उपस्थित सर्व स्तब्ध झाले. स्थानिक नागरिकांनी येथील नगरसेविका रूपाली गायकवाड यांचे पती दीपक यांना या बेवारस रडणाºया बाळाची माहिती दिली. त्यानंतर गायकवाड यांनी पोलिसांना याबाबत दिलेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, पोलीस हवालदार सुुहास पन्हाळे, तात्यासाहेब खाडे, पोपट नाळे, रूपेश साळुंके हे तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले. शहर पोलिसांनी आजूबाजूला चौकशी करून तत्काळ अर्भकाला ताब्यात घेऊन प्राथमिक उपचारांसाठी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर पुन्हा अर्भक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या वेळी महिला पोलीस कर्मचारी प्रेमा सोनवणे यांनी त्या बाळाला आईच्या प्रेमाची ऊब दिली. त्यामुळे मातेपासून दुरावलेले हे अर्भक थोडे शांत झाले.शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख अशोक धुमाळ यांनी हा प्रकार गांभीर्याने घेऊन मातापित्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न तत्काळ सुरू केला. धुमाळ यांनी पुरुष जातीच्या या अर्भकाच्या छायाचित्रासह आवश्यक माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली. बारामतीकरांनीदेखील धुमाळ यांना प्रतिसाद देऊन त्यांनी व्हायरल केलली अर्भकाची पोस्ट सर्वत्र पोहोचवली. त्यावरील नवजात अर्भकाचे छायाचित्र पाहून बारामतीकर हळहळले. ‘माळेगाव कॉलनी येथे रस्त्यालगत ३ ते ४ दिवसांच्या अर्भकाला अज्ञाताने सोडून दिलेले आहे. त्याच्या आई-वडिलांबाबत माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाºयाचे नाव गुप्त राखले जाईल,’ असे आवाहन पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी सोशल मीडियावर केले आहे.नवजाज अर्भकाचा कडाक्याच्या थंडीपासून बचाव होण्यासाठी, त्याला उघड्यावर सोडून जाणाºया अज्ञात मातापित्यांनी चांगलीच दक्षता घेतली होती. मखमली कापडात गुंडाळलेल्या या बाळाला स्वेटर घालण्यात आला होता. त्यानंतर ‘लव्ह’ लिहिलेल्या उबदार लोकरसदृश कापडात बाळाला लोकरी कानटोपीसह गुंडाळून ठेवण्यात आले होते. कुडकुडणाºया थंडीपासून नवजात अर्भक सुरक्षित राहावे, यासाठी दक्षता घेतली होती. अर्भकाजवळ दुधाने भरलेली बाटलीदेखील ठेवलेली होती. मात्र, अर्भकाला उघड्यावर बेवारसपणे सोडून देऊन त्या मातापित्यांनी दाखविलेल्या निर्दयीपणाबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.पोलीस उपनिरीक्षक आर. आर. भोसले म्हणाले, की या अर्भकाला केडगाव (ता. दौंड) येथील शिशू संगोपन केंद्रामध्ये ठेवणार येणार आहे. या वेळी भोसले यांच्यासमवेत अर्भकाच्या एक दिवसाच्या आईची भूमिका पार पाडणाºया महिला पोलीस कर्मचारी सोनवणे यांना नवजात अर्भक चांगलेच बिलगले होते. सोनवणे यांनादेखील ३ महिन्यांचे लहान बाळ आहे. त्या बाळाला घरी ठेवून आज त्यांनी कर्तव्यनिष्ठेपलीकडे जाऊन दाखविलेली ‘ममता’ सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांना माहिती देणारे गायकवाड यांनीच शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार माता-पित्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेकून दिलेल्या नवजात अर्भकाला पोलिसांच्या मायेची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 2:24 AM