राजगुरुनगर : अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या खटल्यामध्ये राजगुरुनगर येथील न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. जुन्नर तालुक्यातील कबाडवाडी येथील १४ वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन सलग १५ दिवस तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोघांना १० वर्षे सक्तमजुरीची आणि त्यांना मदत करणाऱ्या वाहनचालकास ४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा राजगुरुनगरचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी ठोठावली.हा गुन्हा २०१३ मध्ये घडला होता. संतोष कारभारी कानडे (वय २६, मूळ रा. आडगाव, ता, राहाता, जि. अहमदनगर) आणि किरण गोरक्षनाथ जाधव (वय २६, मूळ रा. वाकडी, ता. राहाता, जि. अहमदनगर) आणि आकाश बाळू लोखंडे (वय २१, रा. गोलेगाव, ता. जुन्नर) अशी आरोपींची नावे आहेत.याबाबत सविस्तर हकीकत अशी : संतोष कानडे आणि किरण जाधव दोघे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आरोपी कबाडवाडी (ता. जुन्नर) येथे कामानिमित्त आले होते. ते पीडित मुलीच्या घराजवळच राहत होते. पीडित मुलगी ८ मे रोजी घरापाठीमागे शौचाच्यानिमिताने गेली होती. त्या वेळी तेथे अगोदरच दबा धरून बसलेल्या आरोपीने देवदर्शनाला जायचे आहे आणि गाडीत अजून एक मुलगी बसली आहे, असे सांगून तिला बळेच मारुती-ओमनी गाडीमध्ये बसवले. तिला २२ मेपर्यंत पुणे, नाशिक, भादेरवा (गुजरात), शिर्डी, औरंगाबाद, वैजापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेले. त्या ठिकाणी सलग पंधरा दिवस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला.पोलिसांनी तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. हा खटला येथील न्यायालयात चालू होता. खटल्यामध्ये मुलीच्या बाजूने सरकारी वकील अॅड. स्वाती आचार्य-उपाध्ये यांनी बाजू मांडली. त्यांनी एकूण ८ साक्षीदार तपासले. त्यात मुलगी, तिची आई, डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यात आरोपी संतोष कानडे आणि किरण जाधव यांना अपहरण, बलात्कार, तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुक्रमे ४ वर्षे, १० वर्षे आणि १० वर्षे सक्तमजुरी, तसेच २ हजार, १ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)
दोघांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By admin | Published: July 28, 2016 3:54 AM