पुणे : पूर्व वैमनस्यातून एकावर चाकूने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
अमन उर्फ करण राजू वाल्मीकी (वय २०), ओंकार उर्फ ओम्या मोहन शिंगे (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १९ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. १७ सप्टेंबरला रात्री पावणेदहा वाजता ताडीवाला रोड परिसरात ही घटना घडली.
जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादी यांच्या पोटात, पाठीत चाकूने वार करून, तसेच लाकडी बांबूने डोक्यात, हातावर मारहाण करून गंभीर जखमी करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील हत्यार जप्त करण्यासाठी, गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी, गुन्ह्यातील हत्यारे त्याने कोठून आणली? त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का? याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंग जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.