येरवडा - दोन महिन्यांपासून सासवड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार असलेल्या आरोपीला व त्याच्या साथीदाराला येरवडा पोलिसांनी दोन गावठी कट्टे, १६ जिवंत काडतुसे व एका मोबाईलसह अटक केली. त्यांच्याकडून जवळपास ४३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई ही येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉमर झोन परिसरात करण्यात आली.याप्रकरणी तुकाराम सखाराम बडदे (वय २१, रा. मु. पो. कोडीत, ता. पुरंदर) व तुषार गेनबा जरांडे (वय २४, रा. सदर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे असून त्यांच्याविरोधात बाळासाहेब बहिरट यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २) दुपारी २च्या सुमारास दोन अज्ञात तरुण हे कॉमर झोन येथील बस स्थानकावर संशयास्पद थांबल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाल्यावर परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन, गुन्हे शाखेचे अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, गणेश कुताळ यांच्यासह बाळासाहेब बहिरट, अजीज बेग, हनुमंत जाधव, नागेश पूवर, शरद बांगर, गणेश शिंदे, अजय पडोळे यांनी परिसरात सापळा रचून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी पळून जायच्या प्रयत्नात असताना अजय पडोळे व गणेश शिंदे या दोघांनी आरोपींना फिल्म स्टाईलने पाठलाग करून पकडले. विशेष म्हणजे, दोन्ही कट्टे हे काडतुसांनी भरलेले असतानादेखील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आल्याने पोलीस पथकाचे परिसरात अभिनंदन होत आहे. यातील तुकाराम बडदे यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यामध्ये खंडणीच्या विरोधात गुन्हा दाखल असून तो २ महिन्यांपासून सासवड पोलिसांना गुंगारा देत आहे.
कट्टे, काडतुसांसह दोघांना अटक, खंडणीतील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 3:34 AM