या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यांची नावे कौस्तुभ शंकर गंभीर (वय ३०, रा. खामुंडी), आंतिराम गंधास भालेरा (मूळ गाव पालासपाने, पो. चाचरिया, ता. सेंधदा, जि. वडवाणी, मध्यप्रदेश) असे आहे; परंतु तो सध्या खामुंडी येथेच राहत होता.
ओतूर पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोलवड जवळील जांभूळपट (ता. जुन्नर) येथील शेतकरी गबफणेश शिंगोटे यांचा विद्युत प़ंप पाण्यात ढकलण्यासाठी अरुण शिंगोटे व कौस्तुभ गंभीर हे आले होते. गणेश शिंगोटे व त्याचा मजूर आंतिराम भालेरा हे दोघेही तेथेच होते.
कौस्तुभ गंभीर व आंतिराम भालेरा हे दोघे विद्युत पंप ढकलण्यासाठी नदीपात्रात उतरले व विद्युत पंप ढकलून नेत होते. शेतकरी शिंगोटे हे विद्युत डीपीजवळ बसून होते, परंतु पंप ढकलणाऱ्यांच्या बोलण्याचा आवाज येईना म्हणून नदीपात्रात जाऊन पाहिले, तेव्हा हे पंप ढकलणारे दोघेही दिसले नाहीत. म्हणून तेथील स्थानिक वायरमनला फोन करून बोलावून घेतले. वायरमन व अन्य ग्रामस्थ तेथे आले व नदीपात्रात शोध घेतला असता त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
तपासणीसाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता ते दोघेही मृत झाल्याचे समजले. दोघांचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले आहेत.
शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे कारण समजेल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी सांगितले.