बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहेरघरी राष्ट्रवादीचेच दोन्ही गट आता आमनेसामने येणार आहेत. अजित पवार यांनी भाजपबरोबर जात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बारामतीच्या राजकारणाची गणिते बदलली आहेत. अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागील महिन्यात निवडी पार पडल्या. त्यापाठोपाठ बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ एस.एन. जगताप यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यावेळी उपस्थित होते. या निवडीनंतर आता दोन्ही गटांचे पदाधिकारी आता एकमेकांविरोधात दंड थोपटण्याचे संकेत आहेत.
यानिमिताने बारामतीत शरद पवार गटाने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे संकेत आहेत. सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत हे पवार विरुद्ध पवार अशा जोरदार लढती रंगण्याचे संकेत आहेत.
बारामतीतील सर्व संस्था अजित पवार यांच्या ताब्यात आहेत. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून संस्था पदाधिकारी निवड अजित पवारच निर्णय घेत असत. त्यामुळे अजित पवार यांचीच कार्यकर्त्यांवर पकड मजबूत आहे. परिणामी त्यामुळे शरद पवार गटाला पक्षाचे माहेरघर अडचणीचे ठरले होते. सुमारे साडेतीन महिन्यांच्या कालावधीनंतर आता पदाधिकारी कल जाहीर करू लागले आहेत. काही प्रमुख नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात सहभागी होणे पसंत केले आहे.
शरद पवार गटाकडून लवकरच बारामती शहरात पक्ष कार्यालय सुरू केले जाणार आहे. याशिवाय पक्षाचे शहराध्यक्ष व अन्य निवडी लवकरच केल्या जाणार आहेत. या गटात कोण कोण जाते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सध्या असणाऱ्या पक्ष कार्यालयाचा ताबा कोणाकडे राहणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. आगामी निवडणुकांवर या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची व्यूहरचना महत्त्वाची ठरणार आहे. शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यास सुरुवात केली आहे.