पुणे : अॅड़ देवानंद ढोकणे यांच्यावर सोमवारी रात्री गोळीबार करुन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने आज जेरबंद केले. कुर्मादास बडे(रा़ शिरुर) असे त्याचे नाव असून दुसऱ्या संशयित आरोपी अल्पवयीन आहे.
एक दिवाणी केस बडे याने अॅड़ देवानंद ढाकणे यांच्याकडे दिली होती़. हा खटला लढविण्यासाठी त्यांनी अॅड़ ढाकणे यांना २ लाख रुपये फी दिली होती़ मात्र, खटला सुरु होण्यापूर्वीच बाहेर त्यांच्या तडजोड झाली होती़. त्यामुळे बडे हा अॅड़ ढाकणे यांच्याकडे फी परत मागत होता़. मात्र, त्यांनी ती परत न केल्याने त्याने एका मुलाच्या मदतीने सोमवारी रात्री त्यांच्यावर पाळत ठेवून गोळीबार करुन त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता़.
व्यावसायिक कारणावरुन हा गोळीबार झाल्याचा पोलिसांना सुरुवातीपासून संशय होता़. त्यानुसार त्यांच्याकडील पक्षकारांची माहिती घेताना बडे याची माहिती मिळाली होती़. गुन्हे शाखेने रात्रभर विविध ठिकाणी छापे मारुन त्यांचा शोध घेतला जात होता़. मंगळवारी सकाळी चिखली परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी दोघांना ताब्यात घेतले़. दरम्यान, या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी शिवाजीनगर न्यायालयातील वकिलांनी न्यायालयातील कामकाजावर बहिष्कार टाकून न्यायालयाच्या गेटबाहेर निर्दशने केली़. त्यात वकिल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़.
अॅड़ देवानंद आणि भरत ढोकणे यांनी सोमवारी सायंकाळी न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर आपल्या पक्षकारांच्या गाठी भेटी घेतल्या़. त्यानंतर काल रात्री आठच्या सुमारास ते स्वीफ्ट कारने येरवडा येथील घरी निघाले़. भरत ढोकणे हे कार चालवत होते़. तर देवानंद ढोकणे हे त्यांच्या शेजारी बसले होते़. संगमवाडी येथील बीआरटी बसस्टॉपसमोर कार आली असताना तेथील स्पीड ब्रेकरमुळे कार हळू झाली़. ही संधी साधत पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोराने कारमध्ये डाव्या बाजूला बसलेल्या देवानंद यांच्यावर अगदी जवळून तीन गोळ्या झाडल्या होत्या़. त्यांच्यावर अद्याप अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.