कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा व सणसवाडी (ता. शिरूर) येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांत बुधवारी मनोमिलन झाले. स्थानिकांचेच कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. कारण नसताना गावाचे सोशल मीडियावर नाव बदनाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी करतानाच शौर्य विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणा-या नागरिकांचे आम्ही स्वागतच करू, असे आश्वासन बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली.कोरेगाव भीमामध्ये तिसºया दिवशीही जमावबंदी लागू आहे. आज काही प्रमाणात जनजीवन सुरळीत चालू असूनही गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून मंगळवारी (दि.२) रोजी रात्री शिक्रापूर पोलीस ठाण्यात कोरेगाव भीमा येथील मराठा व बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांची एकत्रीत बैठक पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील व शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.या बैठकीत दोन्ही समाजांनी गावात एकोपा असल्याचे व विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाºया अनुयायांचे स्वागतच होईल, अशी ग्वाही दिली होती.त्यानंतर बुधवारी सकाळी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस घोडगंगेचे माजी संचालक विठ्ठल ढेरंगे, जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, माजी पंचायत समिती सदस्य पी. के. गव्हाणे, नारायणराव फडतरे, विक्रमराव गव्हाणे, अशोक गव्हाणे, राजाराम ढेरंगे, सरपंच संगीता गव्हाणे, उपसरपंच कल्पना गव्हाणे, विजय गव्हाणे, अशोक काशिद, केशव फडतरे, अरविंद गव्हाणे, उमेश गव्हाणे, विक्रम दौंडकर, बबन गव्हाणे, संपत गव्हाणे, योगेश गव्हाणे, प्रकाश ढेरंगे, वृषाली गव्हाणे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना विठ्ठलराव ढेरंगे यांनी सांगितले की , ‘कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत कोरेगाव ग्रामस्थांचा कसलाही संबंध नसताना गावाचे नाव बदनाम होत आहे. यापूर्र्वी विजयस्तंभास मानवंदना देण्यात येणाºया अनुयायांना गाव म्हणून सुविधा पुरिण्यातच येत होत्या. यापुढेही त्यांचे स्वागतच करण्यात येईल. स्थानिक ग्रामस्थांचे बाहेरच्या लोकांनी मोठे नुकसान केले असून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. बौद्ध समाजाच्या वतीने राजेंद्र गवदे, भाऊसाहेब भालेराव, सचितानंद कडलक व इतर ग्रामस्थांनीही कोरेगावच्या दुर्घटनेबाबत बोलताना सांगितले की, ‘समाजकंटकाच्या चिथावणीवरून वादाची ठिणगी पेटली. गावाचे नाव वापरून लोक गैरफायदा घेत असल्याचे सांगत उलट सवर्ण व दलित समाजाच्या लोकांनी मिळून महिला, मुलांचे संरक्षण केल्याचे सांगितले.
कोरेगाव भीमामध्ये दोन्ही गटांचे मनोमिलनाचे सूर, गावाचे नाव बदनाम होत असल्याची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 2:36 AM