पुणे : जादा पैशांचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना सायबर भामटे फसवत आहेत. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. सोशल मीडियावर टास्क देऊन मेंबरशिपच्या नावाखाली आधीच पैसे घेतले जातात. सुरूवातीला काही टास्क पूर्ण केल्याने किरकोळ रक्कम बँक खात्यात टाकली जाते, मात्र त्यानंतर लाखो रुपयांची फसवणूक करण्याचा गोरख धंदा सध्या तेजीत सुरू आहे. एरंडवणे आणि कात्रज येथील दोघांना सायबर गुन्हेगारांनी ४४ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनुक्रमे डेक्कन आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील पहिल्या घटनेत गौतम शिरीष करजगी (४२) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सोशल मीडियावरील आरोपींनी गौतम करजगी यांना ऑनलाइन अ`पच्या माध्यमाने संपर्क साधला. त्यांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून टास्क पूर्ण करण्यास सांगितले. करजगी यांनी टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांना वेगवेगळी कारणे दाखवत बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. करगजी यांनी सायबर भामट्यांवर विश्वास ठेवत त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात एकूण २२ लाख रुपये जमा केले. त्यानंतर मात्र सायबर भामट्यांनी कोणताही परतावा त्यांना दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत घडला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गुन्हे शंकर साळुंखे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत कात्रज येथील रामकृष्ण साहेबराव चोरगे (३७) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत चोरगे यांना सायबर भामट्यांनी फोन करुन सनटेक डिजिटल कंपनीतून बोलत असल्याचा मेसेज केला. आरोपींनी सोशल मीडियावरील चॅनलला सबस्क्राईब करण्याचे पार्ट टाईम जॉब देण्याचे आमिष त्यांना दाखवले. त्यानंतर दुसऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना एक लिंक पाठवून ग्रुपमध्ये जॉईन होण्यास सांगितले. त्यानंतर चोरगे यांना टास्कमध्ये २५ ते ५० टक्के कमिशन देण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन केला. जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार चोरगे यांनी २२ लाख २३ हजार रुपये पाठवले. मात्र, त्यानंतर त्यांना कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी चोरगेंनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत अर्ज दिला. सायबर पोलिसांनी हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड करत आहेत.