ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 08:10 PM2024-11-01T20:10:20+5:302024-11-01T20:10:28+5:30
अजित पवार यांचा १५ तासात तालुक्यातील ५९ गावांमध्ये दाैरा
बारामती- विधानसभा निवडणुक अवघ्या १८ दिवसांवर आली आहे.त्यामुळे एेन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी बारामतीत दोन्ही ‘पवारां’ची धावाधाव सुरु आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष्मीपुजनाच्या मुहुर्तावर बारामती तालुक्यात १५ तासांत ५९ गावांचा दाैरा केला.यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी स`थानिक अडचणी जाणून घेत मतदारांशी संपर्क साधत त्यांची भुमिका मांडली.
शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री पवार यांचा दाैरा सकाळी ७ वाजताच सुरु झाला.मळद,गुणवडी गावांपासून सुरु झालेला हा दाैरा रात्री १० पर्यंत धुमाळवाडी,येळेवस्ती पर्यंत नियोजित होता.राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख नेते म्हणुन उपमुुख्यमंत्री पवार यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.त्यामुळे पवार यांनी बारामतीकरांपर्यंत पोहचण्यासाठी एकाच दिवशी १५ तासांत ५९ गावांमध्ये दाैरा केला.यावेळी पवार यांनी गावकर्यांच्या भेटीगाठी घेतल्या.यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असून या सरकारमध्ये आपल्याला पुन्हा एकदा महत्वाचे पद मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
मागे जे झाले ते गंगेला मिळालं. लोकसभेच्या वेळी जी निवडणुक झाली, जे मतदान झाले, तो तुमचा अधिकार होता. त्याबाबत आता मला काही बोलायचे नाही. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत तुम्ही कोणाचेही भावनिक आवाहन न एकता मला मतदान करुन निवडून द्या. बारामती तालुक्याचा अधिक फायदा करण्यासाठी मला निवडून द्या, आपण यापेक्षा अधिक कामे करु. तुम्हाला खात्रीने सांगतो, यावेळी राज्यात महायुतीचेच सरकार येणार हे निश्चित आहे. आपल्याला चांगले पद मिळणार आहे.
मात्र, कोणीही येइल आणि भावनिक करेल तर तुम्ही भावनिक होवू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. दरम्यान,पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी आज बारामती शहरात पायी चालत मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला.तसेच खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह जय पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पवार यांच्या प्रचाराची सुत्रे हाती घेतली आहेत.
तसेच गेल्या दोन दिवसांपासून खासदार सुप्रिया सुळे,महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी शहरातील व्यापारी,नागरीकांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.त्यामुळे एेन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव सुरु असल्याचे चित्र आहे.