पुणे : शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभाच्या उद्घाटनाला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांना निमंत्रण दिले होते. निमंत्रण पत्रिकेत दोघांची नावे देखील होती. परंतु, दोन्ही पवारांनी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला दांडी मारली. त्यामुळे पवार एका मंचावर येणार असल्याची चर्चा हवेतच विरली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या संमेलनाचा शुभारंभ सोहळा आज (दि.५) सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात येत आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची नावे निमंत्रण पत्रिकेत दिली होती. परंतु, आज अजित पवार यांना एका कार्यक्रमानंतर नाट्य संमेलनाला जाणार का ? असे प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी विचारले.
तेव्हा ते म्हणाले, उद्घाटन नाही, पडद्याचे काही तरी आहे. निमंत्रण नाही. कसंय माझे नाव कुठंही टाकतात.’’ यावरून नाट्यसंमेलनाला ते जाणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान याविषयी संमेलनाचे आयोजक मेघराज राजेभोसले यांनी मात्र अजित पवार आणि उदय सामंत यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिले होते. तरी देखील अजित पवार यांनी याविषयी माहिती नसल्याचे सांगून संमेलनाला जाण्याचे टाळले. तसेच शरद पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी देखील संमेलनाला दांडी मारली. त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संमेलन उद्घाटन सोहळा झाला. खरंतर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती आवश्यक असते, पण ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.