पुणे : आंदेकर टोळीतील दुहेरी मोक्कामध्ये फरारी असलेल्या दोघा गुन्हेगारांना चतु:श्रृंगी पोलिसांनीकोल्हापूरातील अदमापूर येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
सूरज ऊर्फ गणेश अशोक वड्ड (वय २४, रा. मंगळवार पेठ) आणि पंकज गोरख वाघमारे (वय २६, रा. गाडीतळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले की, मोका व दरोड्यातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अंमलदार इरफान मोमीन व सुधीर माने यांना माहिती मिळाली की, सूरज वड्ड व पंकज वाघमारे हे दोघे कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे आहेत. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अदमापूर येथे जाऊन आरोपींची माहिती काढून त्यांना ताब्यात घेतले. सूरज याच्याकडे एक पिस्तुल व दोन काडतुसे सापडली. सुरज याच्याविरुद्ध पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारहाणीचे १५ गंभीर गुन्हे असून चतु:श्रृंगीत दोन व खडक पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात ते फरार होते. आंदेकर टोळीसाठी तो कार्यरत होता. मंगळवार पेठेतील दुकानदारांना धमकावून त्यांच्याकडून हप्ते वसुली करीत होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, महेश भोसले, अंमलदार सुधीर माने, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, तेजस चोपडे, संतोष जाधव, मुकुंद तारु, दिनेश गडाकुंश, प्रकाश आव्हाड, प्रमोद शिंदे, ज्ञानेश्वर मुळे यांनी ही कामगिरी केली..........केअर टेकरच्या गुन्ह्यात दरोड्याचे कलम समाविष्ट केअर टेकर म्हणून कामाला येऊन ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याच्या दोन घटना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या. त्यातील पंचवटी येथील घटनेत मुख्य सूत्रधार हांडे याच्याबरोबर आणखी पाच जण असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर दरोड्याचे कलम वाढविण्यात आले आहे. याचबरोबर दोन्ही गुन्ह्यातील चोरुन नेलेल्या ऐवजापैकी ८० टक्के ऐवज जप्त केला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी सांगितले.