इंदापूर : येथील उपकारागृहाच्या शौचालयाच्या खिडकीचे गज तोडून, वाकवून बँक दरोड्यातील अट्टल गुन्हेगाराने पलायन केल्याची घटना आज (दि. ११) पहाटे सव्वातीनच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगन्नाथ लोकरे (वय ३३, रा. शिराळ, ता. माढा, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. तो आणि त्यास पळून जाण्यास मदत करणाऱ्या साथीदाराविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार महादेव नाना नरसिंगे यांनी फिर्याद दिली आहे. नरसिंगे हे आपले सहकारी पोलीस शिपाई आसिफ आत्तार, पोलीस नाईक डोळस यांच्यासह कालपासून इंदापूर उपकारागृहात गार्ड ड्युुटीवर होते. आज पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कारागृहातील एक कैदी सुरेश भाटी याने त्यांना आवाज दिला. फिर्यादी व त्याचे सहकारी आत गेले. त्या वेळी त्यांना कारागृहातील शौचालयाच्या खिडकीचे चार गज कापलेले व एक गज वाकवलेला दिसला. कैदेत असणाऱ्या आरोपींपैकी ज्ञानेश्वर लोकरे बेपत्ता झाल्याचेही दिसून आले. त्यास पळून जाण्याकरिता खिडकीची जाळी काढण्यास कोणत्या तरी आरोपीने मदत केल्याचा संशय फिर्यादीमध्ये नरसिंगे यांनी व्यक्त केल्याचे ठाणे अंमलदार वाघमोडे यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. के. नाळे पुढील तपास करत आहेत.दरम्यान, अतिरिक्त पोलीस अध्ीाक्षक रवीन्द्रसिंग परदेशी, दौंडचे विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांनी घटनास्थळास भेट दिली आहे.यवत : यवत पोलीस स्टेशनच्या कोठडीमधून चोरीच्या घटनेतील आरोपी फरारी झाला आहे. ही घटाना आज (दि. ११) पहाटेच्या सुमारास घडली. बली ऊर्फ बल्या रामाना पवार ( वय २०, रा. पिंपरी सांडस, अष्टापूर फाटा , ता. हवेली) असे फरारी झालेल्या आरोपीचे नाव आहे.पोलीस हवालदार अप्पासाहेब मोरे यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. ठाणे अंमलदार संतोष शिंदे व पोलीस सारिका गाढवे यांनी याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी बली पवार याला यवत पोलिसांनी गुरुवारी (दि.७) देऊळगाव गाडा (ता. दौंड) गावाच्या हद्दीत चोरीप्रकरणी अटक केली होती. त्या वेळी त्याने महालक्ष्मी हॉटेलसमोर रोड लगत टेम्पोची काच काढून चालकाला चाकू दाखवून रोख रक्कम व मोबाईल चोरून नेला होता. न्यायालयाने सदर आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडी दिली होती.त्यानुसार आरोपी यवत पोलिसांच्या कस्टडीत होता. आज पहाटे आरोपीने संधी साधून ठाणे अंमलदारच्या बाजूला असलेल्या कस्टडी खोलीच्या वरील बाजूच्या गजांमधून निसटून पळ काढला. याचा मागमूसदेखील त्याने कोणत्याही पोलीस अथवा ठाणे अंमलदार म्हणून ड्यूटी करणाऱ्या हवालदारास लागू दिला नाही. आरोपी पळाला असल्याचे सकाळी पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर सर्व पोलीस स्टेशनमधील कर्मचारी वर्गाची धावपळ झाली. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक सुशांत किनगे व इतर पोलिसांची पथके फरारी आरोपीला पकडण्यासाठी रवाना केली होती. परंतु रात्री उशिरापर्यंत आरोपीचा तपास लागू शकलेला नव्हता.
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दोघांचे पलायन
By admin | Published: May 12, 2015 4:12 AM