पुणे : आजारपणामुळे घरी राहिलेल्या तरुणाला जेवणानंतर पानटपरीवर जाणे चांगलेच महागात पडले. त्याचे मित्र पळून गेल्याने टोळक्याच्या तावडीत तरुण पडला. टोळक्याने त्याच्या डोक्यात, पोटात काचेची बाटली खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत वेदांत सारसेकर (वय २६, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी ऋतिक राजेश गायकवाड (वय २२), उजेद शाहिद शेख (वय २१) आणि अरमान इकबाल शेख (वय २२, तिघे रा. मंगळवार पेठ) यांना अटक केली आहे. त्याचे साथीदार तौफिक भोलावाले, पवन ढिले व अन्य २ ते ३ जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कमला नेहरु चौकातील पानटपरीजवळ रविवारी रात्री दहा वाजता घडला.
याबाबत अधिक माहितीनुसार, फिर्यादी वेदांत सारसेकर यांना बरे नसल्याने ते घरी होते. रात्री साडेआठ वाजता त्यांच्या ओळखीचा तेजस होनमाने व अजिम सय्यद यांच्यात १५ ऑगस्ट चौकात भांडणे झाली होती. रात्री दहा वाजता फिर्यादी हे कमला नेहरु चौकातील पान टपरीवर गेले होते. त्यावेळी त्यांचे मित्र गप्पा मारत बसले होते. अचानक तौफिक भोलावाले, पवन ढिले, ऋतिक गायकवाड व त्यांचे साथीदार लोखंडी रॉड, हॉकी स्टीक, काचेच्या बाटल्या, कोयते घेऊन आले. त्यांना पाहून फिर्यादीचे मित्र पळून गेले.
फिर्यादी त्यांच्या तावडीत सापडले. पवन ढिले याने हॉकी स्टिकने मारहाण केली. रफिक शेख याने काचेची बाटली त्यांच्या पोटात मारली. तौफिक भोलावले याने रॉड डोक्यात मारला. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तौफिक भोलावाले याने हातातील हत्यारे हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत, इथुन पुढे आमच्या सोबत कोणी पंगा घेतला तर त्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याने लोकांनी दुकाने, पानटपरी बंद केली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक मंगेश जगताप तपास करीत आहेत.